पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी वारी नियोजनासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत सर्व विभागांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश पालकमंत्री गोरे यांनी दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयपीएस प्रशांत डगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, युवानेते प्रणव परिचारक, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, भाजपा प्रदेश किसान मोर्चा सचिव माऊली हळणवर, शहराध्यक्ष रोहित पानकर, मंडलाध्यक्ष हर्षद कदम यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्तिकी वारी दरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्यसेवा केंद्रे, तात्पुरती शौचालये आणि निवासस्थानांची उभारणी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
तसेच गोपाळपूर रोडवरील दर्शन पत्राशेड आणि भक्ती सागर ६५ एकर परिसरातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी भाविकांशी थेट संवाद साधला.
यावर्षी (२०२५) कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी साजरी होणार असून शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारीची सर्वांगीण तयारी सुनिश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

