इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
काँग्रेस पक्षातील विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टूडेंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेच्या पुणे शहर व जिल्हाध्यक्षपदी घोरपडवाडी ता. इंदापूर येथील ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती NSUI प्रदेश अध्यक्ष सागर साळुंखे व राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी अक्षय यादव यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
NSUI ही देशातील सर्वात जुनी आणि सक्रीय विद्यार्थी संघटना असून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, शिक्षणातील समानता आणि संधीसाठी अखंड लढा देत आली आहे. स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्याय या तत्वांवर आधारित ही संघटना देशभरात विद्यार्थी वर्गाचा आवाज बुलंद करते.
ॲड. अभिजीत गोरे-देशमुख हे गेल्या ११ वर्षांपासून काँग्रेस पक्ष व NSUI संघटनेत सक्रिय कार्यरत आहेत. त्यांनी तालुका पातळीवरून कार्याची सुरुवात करून प्रदेश महासचिव पदापर्यंत प्रवास केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली NSUI ने पुणे विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आंदोलने, निवेदन मोहिमा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
ॲड. गोरे-देशमुख हे विद्यार्थी प्रश्नांवरील आक्रमक भूमिका, संघटन कौशल्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी घट्ट संवाद यासाठी ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या फी वाढ, परीक्षा गैरव्यवस्था, महाविद्यालयीन सुविधांवरील अन्याय याविरोधात त्यांनी अनेक वेळा लढे उभे केले आहेत.
त्यांच्या या फेरनियुक्तीनंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक वरिष्ठ नेते, विद्यार्थी आणि कार्यकर्ते फोनद्वारे आणि सोशल मीडियावरून अभिनंदन करत आहेत.
ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांनी सांगितले की,“NSUI ही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी झगडणारी विचारधारा आहे.विद्यार्थ्यांच्या न्याय, संधी आणि सन्मानासाठी प्रत्येक कॉलेजच्या दारात ही संघटना उपस्थित राहील.महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न हा आमचा स्वतःचा प्रश्न आहे.”
ही फेरनियुक्ती NSUI ला नवचैतन्य देणारी ठरणार असून पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी चळवळींना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

