पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यात अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा वाढू लागल्याचे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत दिसले असले, तरी ही वाढ मुख्यतः शहरी भागापुरती मर्यादित राहिली आहे. ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची नावेही नोंदली गेली नाहीत.
उच्च शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा तब्बल ६६ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या राहिल्या आहेत. त्यापैकी १९ महाविद्यालयांमध्ये २० टक्क्यांहून कमी प्रवेश, तर चार महाविद्यालयांमध्ये दहा टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. विशेष म्हणजे, साताऱ्यातील एका महाविद्यालयात केवळ तीनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे धक्कादायक चित्र आहे. राज्यातील ३७२ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २ लाख २ हजार ८८३ जागांसाठी एकूण १ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. म्हणजेच एकूण ८२ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. हे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत वाढले असले, तरी त्यात शहरी भागातील विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेतच राहिली आहेत.
५० टक्क्यांहून कमी प्रवेश झालेल्या ६६ महाविद्यालयांमध्ये एकूण १९,६७४ जागा उपलब्ध होत्या. त्यातील फक्त ५,८७९ म्हणजेच ३० टक्के जागांवरच प्रवेश झाला. या महाविद्यालयांपैकी सर्वाधिक महाविद्यालये पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील ग्रामीण भागातील, तसेच नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांनाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही.
मुंबई विभागातही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील दुर्गम भागातील महाविद्यालयांना विद्यार्थी मिळण्यात अडचणी आल्या.नागपूर विभागातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांतील काही महाविद्यालयांनाही प्रवेश प्रक्रियेच्या अखेरपर्यंत एकही पूर्ण वर्ग तयार करता आला नाही.
यावरून ग्रामीण भागातील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांना अस्तित्व टिकवणेच कठीण होऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे.



 
 
 
 
 
 
