पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून सध्या संतापाचं वातावरण आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून ‘चिकन मसाला’ भेटवस्तू म्हणून देण्यात आल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बीव्हीजी कंपनी विठ्ठल मंदिरात सुरक्षा रक्षक पुरवते.
चिकन मसाल्याची भेट, वारकरी नाराज
श्री क्षेत्र पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान मानले जाते. येथे दरवर्षी लाखो वारकरी ‘माऊली माऊली’चा गजर करत पायी वारी करतात. वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा ही जीवनशैली मानली जाते. मांसाहार, मद्यपान किंवा त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना येथे थारा नसतो. अशा ठिकाणी ‘चिकन मसाल्या’सारख्या वस्तूंची भेटवस्तू म्हणून वाटप झाल्याने अनेक भक्तांचा भावनिक रोष व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये कंपनीचे इतर उत्पादनेही देण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर काही सेवा बीव्हीजी कंपनी आऊटसोर्सिंग पद्धतीने पुरवते. दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून भेटवस्तू देण्यात आल्या. परंतु भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट असल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
BVG कंपनीकडे मंदिरातील सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा 5 कोटी 77 लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला मिळाला होता. मे महिन्यापासून मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी या ग्रुपला मिळालीय. यापूर्वी ठेका असणाऱ्या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. यानंतर मंदिरांनी निविदा प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सीने यासाठी दर दिले होते. विशेष म्हणजे या आठही एजन्सीने सर्विस चार्जेस म्हणून 3.85 इतका समान दर कोट केला होता. मंदिरासाठी जवळपास 220 सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम बीव्हीजी करणार असून यांचा वापर मंदिर दर्शन रांग आणि मंदिर परिसरातील परिवार देवता येथे केला जाणार आहे.
याशिवाय यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी ही बीव्हीजी वर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या बीव्हीजी साठी ही समितीची नियमावली असून या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजीवर असणार आहे.