बार्शी जि. सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
तडवळे येथील भगवती देवी यात्रेत सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी वैराग पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र आता प्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता आहे.
यात्रेच्या दिवशी १३ वेगवेगळ्या पार्ट्यांनी डीजे व बँजो सेट लावून पहाटेपर्यंत डान्स पार्ट्या आयोजित केल्या होत्या. या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी अश्लील नृत्य आणि धांगडधिंगाणा झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
वैराग पोलिसांनी या प्रकरणी FIR क्र. 0322/2025 नोंदवत आयोजकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223, 285, 286, 292, 293, 296 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तथापि, प्रत्यक्ष कार्यक्रमाचे संचालन करणारे बँजो-मालक, डीजे ऑपरेटर आणि अश्लील नृत्य करणाऱ्या १३ पार्टीतील महिला अद्याप आरोपी म्हणून नामनिर्देशित केलेले नाहीत.
अश्लील नृत्य करणाऱ्या पार्टींवर (BNS कलम 296): सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा होऊ शकतो.
बँजो आणि डीजे मालक (गुन्ह्यास मदत): मंच, लाईट्स, डीजे व बँजो उपलब्ध करून देणे हे अपराधास सहाय्य मानले जाते, त्यामुळे त्यांना ‘सह-अपराधी’ म्हणून दोषी ठरवता येऊ शकते.
ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन: रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीवर्धकांचा वापर करण्यास मनाई आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग (BNS कलम 223): जिल्हाधिकाऱ्यांनी घाललेल्या बंदीचे उल्लंघन हा सार्वजनिक सेवकाच्या आदेशाचा अवमान मानला जातो.
“फक्त आयोजकांवर गुन्हा दाखल केल्यास खटला न्यायालयात कमकुवत ठरतो. कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व घटकांना आरोपी करणे हे कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी अत्यावश्यक आहे.”
पोलिसांसमोर आव्हाने
1. व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे प्रत्येक डीजे, बँजो गट आणि नृत्य करणाऱ्यांची ओळख पटवणे.
2. प्रत्येक घटकाची गुन्ह्यातील भूमिका निश्चित करून स्वतंत्र गुन्हे दाखल करणे.
3. आयोजकांपुरती तपास मर्यादित न ठेवता, गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व घटकांना कायद्याच्या चौकटीत आणणे.
‘माझा न्यूज’ने प्रशासनाला जागरूक केले आहे. मुख्य प्रश्न असा आहे की, पोलिस फक्त आयोजकांवर कारवाई करतात की बँजो व डीजे मालकांवर तसेच अश्लील नृत्य करणाऱ्या १३ पार्टींवरही BNS कलम 296, ध्वनी प्रदूषण आणि आदेशभंगासाठी कारवाई होईल?
संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रकरणावर लागले आहे, कारण कायद्याचा सन्मान राखणे आणि नियम मोडणाऱ्यांना बचाव न मिळणे या दोन्ही बाबी समाजासाठी महत्त्वाच्या आहेत.

