पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त भव्य शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना, स्टाफ वेल्फेअर कमिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र व समारंभ समितीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रेय चौधरी यांनी करून दिला. महाविद्यालयातील सीनियर व ज्युनियर विभाग तसेच व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचा श्रीफळ, गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. जे. जी.जाधव म्हणाले, “शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. तो केवळ शिक्षण देणारा व्यक्ती नसून समाजपरिवर्तन व राष्ट्रघडणीचे कार्य करणारा शिल्पकार आहे. एक शाळा सुरू केली की शंभर तुरुंग बंद करावे लागतात, या उक्तीप्रमाणे शिक्षक समाजाचे भविष्य घडवतो.” यावेळी त्यांनी शासनाच्या शिक्षण क्षेत्राकडे असलेल्या दुर्लक्षावरही टीका केली. कंत्राटीकरण, अपुरे वेतन, भरती प्रक्रियेतील विलंब, तसेच अशैक्षणिक कामांचा बोजा या गोष्टींमुळे शिक्षक प्रभावीपणे कार्य करू शकत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षण व आरोग्य ही राष्ट्राच्या प्रगतीची मूलभूत क्षेत्रे असून शासनाने या क्षेत्रांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बाळासाहेब बळवंत हे म्हणाले की, “शिक्षक हा समाजाचा दुवा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्याची उपेक्षा होत असल्याचे दिसते. शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. जागतिक पातळीवरील बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकाने सतत अद्ययावत राहणे गरजेचे आहे. परंतु शासन शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने पाहत नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. ही बाब समाजहिताच्या दृष्टीने धोकादायक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमर कांबळे व प्रा. रोहिणी बावचकर यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत जाधव, अमोल माने, सुरेश मोहिते, तानाजी खरात आदी शिक्षकेतर सेवकांनी विशेष प्रयत्न केले.
या सन्मान सोहळ्यात उपप्राचार्य डॉ. भगवान नाईक नवरे, उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. महेंद्र गजधने, अधिष्ठाता डॉ. समाधान माने, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे आदी मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे मनोगत व विचार शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीस अधोरेखित करणारे ठरले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून झालेला हा कार्यक्रम केवळ सन्मान सोहळाच नव्हता, तर शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांना अधोरेखित करणारा व समाजाच्या चिंतनास प्रवृत्त करणारा सोहळा ठरला.

