भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावाचा सविस्तर नकाशा तयार करून ग्रामस्थांसमोर सादर केला. या नकाशात गावाची भौगोलिक रचना, शेतजमिनीचे प्रकार, पिकांची पद्धत, जलस्रोत, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्ते यांचा समावेश होता.
सादरीकरणावेळी विद्यार्थ्यांनी नकाशातील प्रत्येक भागाचे स्पष्टीकरण दिले. शेतजमिनींच्या प्रकारानुसार पिकांची निवड, सिंचनासाठी उपलब्ध साधनसंपत्ती, तसेच गावातील अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य केंद्र इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती देण्यात आली.गावातील ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि या माहितीचा वापर भविष्यातील विकास आराखडा तयार करण्यासाठी होईल, असे मत व्यक्त केले. या वेळी कृषीदुत मंगेश क्षिरसागर, रामहरी डोंगरे, रोहन खरात, रणजित खटके, शंतनु माळी, चैतन्य राऊत, अविष्कार शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा. एस एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.