पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील तीन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित इंडियन स्पेस लॅब विंटर इंटर्नशिप व टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्रामसाठी निवड झाली असून त्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या इंटर्नशिपसाठी दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृष्णा राजेंद्र पाटील, शिवराज संदीप ढोणे आणि प्रशांत नागनाथ जाधव या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा ४५ दिवसांचा इंटर्नशिप कार्यक्रम दि. ०२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची निवड तांत्रिक परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निवड अशा स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे.
या इंटर्नशिप अंतर्गत विद्यार्थी विविध प्रगत तांत्रिक प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करत आहेत. यामध्ये ओपन व्हीएसपी चा वापर करून सेसना -२१० विमानाचे मॉडेलिंग, फ्यूजन ३६० आणि ईझी ईडीए चा वापर करून ड्युअल रेडंडंट कॅनसॅट / क्यूबसॅट सॅटेलाइट स्ट्रक्चर डिझाईन व पीसीबी लेआउट, तसेच ओपन रॉकेटच्या सहाय्याने सिंगल-स्टेज मॉडेल रॉकेटचे डिझाईन व सिम्युलेशन यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थी क्यूजीआयएस सॉफ्टवेअरच्या मदतीने पंढरपूर शहरातील पोलीस स्टेशन, शाळा व रुग्णालयांचे नेटवर्क विश्लेषण, गुगल अर्थ प्रो चा वापर करून टोपोग्राफिकल मॅपिंग, तसेच ईझी ईडीए वापरून ईएसपी ३२ आधारित सेफ्टी पॅराशूट डिप्लॉयमेंट पीसीबी डिझाईन यांसारखी कामे करत आहेत.
स्वेरीचे संस्थापक व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर यांचे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. पी. एम. पवार आणि स्वेरीचे संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. अभिषेक यांच्या प्रोत्साहन, सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी आवश्यक ते पाठबळ मिळाले व त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले असून या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी डॉ. रोंगे सरांनी घालून दिलेली शिस्त आणि 'पंढरपूर पॅटर्न' ला दिले आहे.


