ग्रंथालय व माहिती विज्ञान क्षेत्रातील कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
ग्रंथालय व माहिती विज्ञान या क्षेत्रात दीर्घकाळ समर्पित सेवा देणाऱ्या सौ. मनिषा राजन कडव यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन डिजिटल विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी (डॉक्टरेट ऑनोरिस कॉझा) प्रदान करण्यात आली आहे.
हा सन्मान त्यांना २ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली-एनसीआर येथील दि गॉर्स सरोवर प्रेमियर या हॉटेलमध्ये पार पडलेल्या विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.मनिषा कडव या शिव शिक्षण संस्था संचालित डी.एस. हायस्कूल, सायन (मुंबई) येथील ग्रंथपाल (लायब्ररीयन) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रंथालय विज्ञान, वाचनसंस्कृती आणि माहिती साक्षरता या क्षेत्रांत गेल्या दीड दशकांहून अधिक काळ महत्वपूर्ण कार्य केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन यलो अचीव्हर्स पुरस्कार समारंमार्तगत वॉशिंग्टन डिजिटल विद्यापीठ यांनी केले होते. विद्यापीठाच्या संचालक मंडळाने त्यांच्या अधिकृत अधिकारांचा वापर करत सौ. कडव यांना ग्रंथालय व माहिती विज्ञान या विषयातील सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. या पदवीसह त्यांना सर्व मान, सन्मान व अधिकार प्रदान करण्यात आले.या गौरवप्रसंगी कडव यांनी आपला मनोगत व्यक्त करताना सांगितले,
"हा सन्मान केवळ माझाच नसून, वाचनसंस्कृतीला चालना देणाऱ्या प्रत्येक शिक्षक, वाचक व ग्रंथालय कर्मचाऱ्याचा आहे. पुस्तकांप्रती असलेली माझी निष्ठा आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याची धडपड हीच माझी खरी प्रेरणा आहे."
त्यांनी धारावी येथील सर्वसाधारण कुटूंबातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वाचन प्रकल्प, वाचनवाढ उपक्रम आणि वाचन सक्षमीकरण कार्यशाळा राबवल्या आहेत. अशी वाचती झाली मुले व ‘पुस्तक मैत्री’ या त्यांच्या उपक्रमांमुळे अनेक वाचक घडले आहेत.कार्यक्रमात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यलो अचीव्हर्स पुरस्कार समारंभात विद्यापीठांच्या प्रतिनिधीनीं सांगितले,"समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा आमचा उद्देश आहे. सौ. कडव यांचे कार्य या उद्दिष्टाशी पूर्णपणे सुसंगत आहे. "या पुरस्कारामुळे ग्रंथालय व माहिती व्यवस्थापन क्षेत्राला नवी प्रेरणा मिळणार असून, वाचनसंस्कृतीच्या प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्यांना जागतिक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.