सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय नागरिक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूर शहर हद्दीत दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.00 वाजल्यापासून ते दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहरात सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये व्यक्ती, समुदाय, मंडळ यांच्यामार्फत प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या (Plasma, Laser beam light, Beam light) वापरास प्रतिबंध केला असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
सोलापूर शहरात दि. 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव व दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हा सण साजरा केला जाणार आहे. तसेच शहरामध्ये तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस आणि अनंत चतुर्दर्शी या दिवशी श्री. गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येतात. या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिरवणुका होतात. या मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकीमध्ये जावू शकते व त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेली लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल असेही आदेशात म्हटले आहे.