कोळा प्रतिनिधी तेज न्यूज
कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी टॉपर्स विद्यार्थ्यांची विद्यार्थी- पालक- शिक्षक सहविचार सभा उत्साही वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन पालक प्रतिनिधी श्री.दिनकर पाटील व सौ.सविता मदने यांच्या शुभहस्ते व प्राचार्य श्रीकांत लांडगे ,पर्यवेक्षक चारुदत्त जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
टॉपर्स योजनेमध्ये 31विद्यार्थी समाविष्ट असून या सभेसाठी 15 पालकांनी सहभाग घेऊन आपल्या अडी-अडचणी व सूचना सांगितल्या. शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी शिक्षक मनोगतात प्रा. तानाजी सरगर यांनी टॉपर्स योजनेचे महत्त्व पटवून दिले. प्रा. अमोल कोरे यांनी कला शाखेच्या वतीने अभ्यासाचे नियोजन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. प्रा. मारुती श्रीराम यांनी शास्त्र शाखेत करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत व जेईई व नीट परीक्षेविषयी माहीती दिली. तसेच प्रा. आनंदा आलदर यांनी स्पर्धा परीक्षा व सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थींनी दूर कसे रहावे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर यांनी आज विद्यामंदिर गुणवत्तेच्या बाबतीत राज्य पातळीवर आपली लौकिकता पसरवत आहे असे गौरवोद्गार काढले. टॉपर्स योजनेतून अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत असे सांगून आपण ही अशा प्रकारे उज्ज्वल यश मिळवून आपले,पालकांचे व कॉलेजचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत लांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे, अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे, चिंतन आणि मनन करावे. तसेच गुणात्मक वाढीसाठी विद्यार्थी पालक शिक्षक यामध्ये सुसंवाद घडला पाहिजे. तसेच संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर करावा असे आवाहन केले.विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत पालकांच्या शंकेचे निरसन केले.
सदर कार्यक्रमास बारावीला अध्यापन करणारे सर्व विषय शिक्षक, टॉपर्स विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. तानाजी सरगर यांनी केले व आभार प्राध्यापिका तांबोळी मॅडम यांनी मानले.