‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ आणि ‘तत्वज्ञ संतश्रेष्ठ श्री जनाबाई समर्पित जीवन गौरव
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली ते सहस्त्रकातील श्रेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या ज्ञान-विज्ञान संगमातील तत्त्वज्ञानाचा पाया हा भारतीय मूळ विचारधारा असणार्या अद्वैताचा आहे. ॐ = ई = एमसी स्वेअर या सिद्धांताचा प्रवासच विश्वाच्या कल्याणाचे सूत्र आहे. हेच सूत्र संपूर्ण विश्वाला भारतमातेच्या रुपात विश्वगुरु बनून शांती व समृध्दीचा मार्ग दाखवेल.” असे विचार श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी मांडले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने वाखरी येथील पालखी तळा शेजारी विश्वशांती गुरुकुल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज समर्पित जीवन गौरव पुरस्कार ’ आणि ‘तत्वज्ञ संतश्रेष्ठ श्री जनाबाई समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी जगदगुरु तुकोबांचे १४ वे वंशज ह.भ.प.बापूसाहेब मोरे, देशभक्त व पत्रकार ह.भ.प. बाळासाहेब बडवे आणि भारुडाद्वारे समाजप्रबोधन करणारे ह.भ.प.हिरामण मोरे यांना ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज समर्पित जीवन गौरव पुरस्कार ’ आणि प्रसिदध किर्तनकार गोदावरीताई मुंडे आणि शशीकलाताई केंद्रे यांना ‘तत्वज्ञ संतश्रेष्ठ श्री जनाबाई समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ ने गौरविण्यात आले. पुरस्काराच्या स्वरूपात ५१ हजार रुपये, शाल, ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा व मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज जवंजाळ, मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष हभप रामेश्वर शास्त्री महाराज हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच हभप तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“स्वामी विवेकानंद यांनी भारतमातेच्या विश्वात्मक स्वरुपाची जी कल्पना केली ती विवेकानंदांचे पाईक होऊन प्रत्यक्ष अवतारीत करण्याची सुसंधी लाभली ही माऊलींची योजनाच समजतो. गेल्या ७ वर्षापासून मला सकाळी सकाळी सूचना येतात की हे कर आणि हे करू नको. त्या संकेतावर विचार चक्र सुरू होते. नंतर भारतीय संस्कृती व तत्वज्ञानाचे खरे स्वरूप मांडण्यासाठी कर्म करतो. ज्यावेळेस समाजात माऊलीचे पसायदान आणि भगवान गौतम बुद्धांच्या पंचशीलाचे मिलाप होईल त्यातूनच विश्वशांतीची दिशा दिसेल. संगीताच्या साधनेतूनच ईश्वर दर्शन व शांत रसाचा अनुभव येईल.”
ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले, “समाज कल्याणासाठी जीवन समर्पित करणारे डॉ. कराड यांच्या मागे प्रयागअक्का यांची पुण्याई आहे. त्यांचा त्याग, तपश्चर्या याचेच हे बळ आहे. त्यांनी जीवनात कधीही सेवा करण्याची संधी सोडलेली नाही. कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या शिखरावर पोहोचले पण अंगी अहंकाराचा जराही वारा लागू दिला नाही. शांतीचा संदेश देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. त्यातूनच त्यांनी वारकरी सांप्रदायाला जगासमोर मांडले.”
ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज म्हणाले, “सत्य संकल्पाचा दाता नारायण या नुसार डॉ. कराड यांना सकाळी सकाळी मिळणार्या संकेतांना साकार करण्यासाठी ते परिपूर्ण प्रयत्न करतात. ते भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे त्रिवेणी संगम आहेत. वैभव संपन्नता असून ही वारकरी संप्रदायाची साथ सोडली नाही. त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचे ज्ञान संपूर्ण जगात पोहोचविले. शिकलेल्या माणसाने इंद्रायणी घाटावर यावे यासाठी घाटांची निर्मिती केली. ज्ञानोबा तुकोबाचा संदेश संपूर्ण जगात पोहोचविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत.”
सत्काराला उत्तर देतांना ह.भ.प. बापूसाहेब मोरे म्हणाले,“ डॉ. कराड यांनी धर्माचे उत्तम कार्य करीत लाखों लोकांचे कल्याण केले आहे. ते ८५ वर्षाचे तरूण आहेत त्यांच्यातील ऊर्जा, उत्साह हा सदैव सत्कर्म करण्यासाठी प्रेरित करीत असतो. ते शिखरावर पोहचले असले तरी त्यांचा मुळ पिंड संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा आहे. त्यांनी लावलेले बीज आज वटवृक्षामध्ये परावर्तीत झाले आहे.”
बाळासाहेब बडवे म्हणाले,“डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जीवनशैलीकडे पाहिले तर ते वारकरी संप्रदायाचे अधिष्ठीत व्यक्तीमत्वाचे आहे. त्यांनी संपूर्ण कुटुंब घडविले आणि तो एक वेगळा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे. पांडुरंगाच्या छत्र छायेत ते वारकरी संप्रदाया बरोबरच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करीत आहेत.”
त्यानंतर गोदावरीताई मुंडे, शशीकलाताई केंद्रे आणि हिरामण मोरे महाराज यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, उर्जा देणारे हे महात्मा आहेत. तसेच संगीत साधनेतूनच ईश्वर दर्शन घडते. याची प्रचिती आज येथे दिसत आहे. डॉ. कराड यांच्यात माऊलीचे रूप पाहतो. त्यांच्या हस्ते हा सन्मान होणे हे आमचे भाग्य आहे.माईर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले.