सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक मोठा क्रांतिकारी निर्णय झाला असून सातारा जिल्हा रूग्णालयाशी संलग्न असलेल्या जीएनएम (General Nursing and Midwifery) अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करून बीएस्सी (नर्सिंग) हा चार वर्षीय अभ्यासक्रम सुरू करण्यास केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय नर्सिंग शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातार्यात बीएस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू व्हावा यासाठी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरवा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या अभ्यासक्रमास मान्यता दिली. याआधी, मुंबई वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने एक तज्ज्ञ समिती पाठवून सातारा जिल्हा रूग्णालयाच्या सुविधा तपासल्या होत्या. शिकवण्याच्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, रूग्णांसोबतचा सराव, ग्रंथालय आणि इतर आवश्यक तरतुदींचे निरीक्षण केले होते. त्यानंतर समितीने या रूग्णालयांतर्गत बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याची शिफारस केली.
सातारा जिल्ह्याला बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज मिळाल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वात झालेला हा निर्णय जिल्ह्याच्या विकासाची एक सुवर्णमोहोर ठरली आहे.
सातार्यासाठी का महत्त्वाचे?
1.स्थानिक विद्यार्थ्यांसाठी संधी : आतापर्यंत नर्सिंगचे पदवीशिक्षण घेण्यासाठी सातार्यातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा नाशिकला धाव घ्यावी लागत होती.
2. रोजगाराच्या संधी : बी.एस्सी. (नर्सिंग) पूर्ण केल्यावर रूग्णालये, मेडिकल कॉलेजेस, फार्मा कंपन्यांमध्ये नोकर्यांची संधी वाढतील.
3. महिला सक्षमीकरण : नर्सिंगमध्ये मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत होईल. 40 जागांसाठी 2025-26 पासून प्रवेश सुरू प्रवेश क्षमता - 40 विद्यार्थी (प्रतिवर्ष)
शैक्षणिक वर्ष- 2025-26
मान्यताधारक संस्था - भारतीय नर्सिंग परिषद (आयएनसी), नवी दिल्ली व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापी(एमयूएचएस), नाशिक
शुल्क नियंत्रण : राज्य शानाच्या नियमांनुसार
सातार्याच्या आरोग्य शिक्षणात आता नवे पर्व सुरू झाले आहे. मेडिकल कॉलेजनंतर आता बी.एस्सी. (नर्सिंग) हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. त्यामुळे सातार्यातील तरूणांसाठी रोजगाराचे नवे द्वार उघडले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील मुली-मुले मोठ्या शहरात जाण्याऐवजी स्थानिक पातळीवरच उच्चशिक्षित होऊ शकतील. आरोग्य सेवा ही मानवतेची सेवा आहे, आणि सातार्यातील तरूण पिढी आता या सेवेसाठी अधिक सज्ज होईल, असे ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले आहे.