पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याचा विस्तार पाहता मध्यवर्ती असलेले पंढरपूर येथे दुसरे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचे निश्चित झाले मात्र हे कार्यालय अकलूज येथे सुरू झाले. पंढरपूरला डावलण्यात आले त्यानंतर अनेक जिल्ह्यातील मागणीचा विचार करून तेथेही नवीन कार्यालये सुरू झाली.मात्र अनेक वर्षांपासूनची मागणी असुनही सोलापूर जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान नाही त्यामुळे अनेक वेळा मागणी करुनही त्याचा गांभीर्याने विचार झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर आणि परिसरातील वाहनांची संख्या पाहता येथे स्वतंत्र परिवहन कार्यालय सुरू होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
येथील कॅंपमध्ये नोंदणी, वाहन परवाना याशिवाय इतर सर्व प्रकारच्या कामासाठी वाहनधारकांना सोलापूर येथे जावे लागते, वेळेबरोबर आर्थिक ताणही सोसावा लागतो ही वस्तुस्थिती विचारात घेऊन, अनेक वर्षाची पंढरपूर व परिसरातील नागरिकांची मागणी पूर्ण करावी अशी मागणी प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते यांनी पत्रात केली आहे.