आटपाडी प्रतिनिधी तेज न्यूज
आपल्या राज्यातून एक अत्यंत वेदनादायी प्रकार समोर आला आहे. एका शिक्षक बापाने आपल्या १७ वर्षांच्या पोटच्या लेकीला नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे व्यवसायाने माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले धोंडीराम भोसले यांनी मुलगी साधना (१७ वर्षे) हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहणीत साधनाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. रविवारी धोंडीराम भोसले याला अटक करण्यात आली.
आरोपी धोंडीराम नेलकरंजी गावात एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करतात. तर त्यांची मुलगी साधना बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती. तिला बारावीला चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते. यानंतर शुक्रवारी रागाच्या भरात धोंडीराम यांनी मुलीला बेदम मारहाण केली. कमी गुण कसे मिळाले असे विचारत तिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात साधना इतकी जखमी झाली की, यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी धोंडीरामला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.