सह्याद्री अतिथीगृहात पदाधिकार्यांनी घेतली भेट
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत दि. 23 व 24 जुलै रोजी साजर्या होत असलेल्या संत नामदेव महाराज व परिवाराच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना अ. भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या शिष्टमंडळाने दिले. दरम्यान सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा समस्त नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.
बुधवार दि. 28 मे रोजी अ. भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी संत नामदेव महाराजांचे वंंशज ह. भ. प. निवृत्ती महाराज नामदास, एकसंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. महेश ढवळे, एकसंघाचे राष्ट्रीय सचिव तथा केशवराज संस्थेचे प्रमुख रुपेश खांडके, उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे, प्रभु सोनवणे, वैभव सदावर्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंढरीत भक्तीसागर येथे उभारण्यात येणार्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय स्मारक तसेच 675 व्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
संत नामदेव महाराज स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे तसेच 675 व्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचेही प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले.