मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
नवी मुंबई: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ली. मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम संस्थेच्या विद्यमाने आरसीएफ हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने, दिनांक १२ मे २०२५ रोजी आरसीएफ हॉस्पिटलच्या प्रांगणात विपणन संचालक निरंजन सोनक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आरसीएफ चे भूतपूर्व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उदय शंकर झा, उपमहाव्यवस्थापक श्रीमती डॉ. रेखा देवाडिगा, जितू खानचंदानी, फोरमचे अध्यक्ष व्ही. डी. पाटील, डी. टी. बारकुंड, प्रभाकरराव साळुंखे, सुबोध मोरजकर, दीपक सालवणकर, सुभाष हांडे देशमुख तसेच दवाखान्यातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
उपस्थितांशी संवाद साधताना फोरमच्या कार्याचे कौतुक करुन श्री. सोनक म्हणाले की, आज बुद्ध पौर्णिमा आहे. खूप चांगला दिवस आहे. या दिवशी तुमच्या सेवेचा गौरव करण्याचा योग आला ही खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. असं सांगून ते म्हणाले की, रुग्णांसाठी तुम्ही फक्त औषध देणाऱ्या परिचारिका नसता तर त्यांचं मनोबल वाढविणारी, त्यांचे अश्रू पुसणारी व आजारातून बरे होण्याची प्रेरणा देणारी एक शक्ती आहात. हे आपण करीत असलेल्या मानवसेवेने वेळोवेळी अधोरेखित झाले आहे.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपस्थित सर्व परिचारिकांचे अभिनंदन करत उदय शंकरच झा म्हणाले की, रुग्णसेवा हे एक व्रत आहे. त्याचे पालन तुम्ही जबाबदारीने करता आहात. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या आदर्शावर चालत तुम्ही समाजात आपले एक स्थान निर्माण केले आहे. रुग्णसेवेप्रति आपले योगदान मोलाच आहे.
प्रसंगी डॉ . रेखा देवाडिगा, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्ही. डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून फोरमच्या कार्याची माहिती देऊन आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले तर दीपक सालवणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.