पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर, १८ एप्रिल २०२५ – एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग यांच्यातर्फे पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या पालक सभेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि पालक यांच्यात समन्वय निर्माण करणे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन सोहळ्याने करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, पालक प्रतिनिधी श्री. अतुल म्हमाणे आणि पालक सभा समन्वयक प्रा. एस.बी.महारनवर उपस्थित होते.
यानंतर विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी सर्व पालकांचे स्वागत केले आणि विभागाची सविस्तर माहिती दिली. या सादरीकरणात महाविद्यालय व विभागाचे व्हिजन व मिशन, विभागीय उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, नोकरी प्राप्त विद्यार्थ्यांची यादी, परीक्षेतील निकाल आणि शिक्षण-शिकवण प्रक्रिया यांचा आढावा घेण्यात आला. आधुनिक अध्यापन तंत्रज्ञान, कार्यशाळा व सतत प्रगती मापन यामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर हे सिहंगड महाविद्यालय भर देत असल्याचे नमूद करण्यात आले.
यानंतर उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी पालक व प्राध्यापक यांच्यातील संवादाचे महत्त्व सांगत, तोविद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
यानंतर पालक सभा समन्वयक प्रा. एस. बी. महारनवर आणि काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध, सुरक्षित आणि प्रगत शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. एका पालकांनी प्रशिक्षण व स्थाननियुक्ती विभागाच्या ट्रेनींग प्लेसमेंट ऑफीसर डॉ. एस. डी. कटेकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्याबद्दल आभार मानले. तसेच महाविद्यालयाच्या सुरक्षा व वसतिगृह कर्मचाऱ्यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
यानंतर प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी पालकांना संबोधित करत त्यांचे उपस्थितीसाठी आभार मानले. त्यांनी
सांगितले की अशा पालक सभांमुळे महाविद्यालय, पालक आणि कर्मचारी यांच्यातील बंध अधिक दृढ होतो, जो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक, संशोधन, प्रशिक्षण, स्थाननियुक्ती, व व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या विविध उपक्रमांची माहितीही पालकांना दिली.
प्रश्नोत्तर सत्रानंतर, ट्रेनींग प्लेसमेंट ऑफीसर डॉ. एस. डी. कटेकर सरांनी महाविद्यालयातील एकूण निवडींबाबत प्लेसमेंट बाबतची माहिती दिली. त्यांनी नमूद केले की यंदा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश सिंहगड महाविद्यालयमध्ये आहे, जे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची साक्ष देतात. कंपन्या, पॅकेजेस आणि निवडीबाबत तपशील दिला.
यानंतर विद्यापीठात रँक मिळवणाऱ्या, नोकरी मिळवलेल्या आणि विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सन्मानाने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.
कार्यक्रमाचा समारोप पालक सभा समन्वयक प्रा. एस. बी. महारनवर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता यांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.