महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध : उपसरपंच नितीन शिंदे
भाळवणी प्रतिनिधी
उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे गुण महिलांमध्ये उपजतच असतात. परंतु महिलांना योग्य वेळी संधी न मिळाल्यामुळे अनेक महिला उद्योग क्षेत्रामध्ये मागे राहतात. महिलांचे उद्योग क्षेत्रातील प्रमाण वाढविण्यासाठी महिलांना योग्य वेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण आयोजित केले होते. यापुढेही महिलांसाठी असे उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे मत उपसरपंच नितीन शिंदे यांनी केले.
भाळवणी (ता : पंढरपूर) येथे ग्रामपंचायत भाळवणी व सुमैय्या इनामदार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवणक्लास, आरी वर्क व ब्युटी पार्लर या महिला व्यवसाय प्रशिक्षणाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजित जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे ग्रामविकास अधिकारी डी एम वाघमारे हे होते.प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवणक्लास, आरी वर्क व ब्युटी पार्लर या व्यवसाय प्रशिक्षणामध्ये गावातील सुमारे 150 महिलांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण घेतले.
यावेळी विजय शिंदे, एस. आर. इनामदार, अंजुम इनामदार तसेच प्रशिक्षणार्थी महिला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी महिला म्हणून रेखा रामचंद्र म्हेत्रे, मोहिनी सुहास पाटील या दोन महिलांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट इंगोले, विशाल म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा शिंदे, सविता लोखंडे, अरुणा गवळी, स्वाती माने, गौरी म्हेत्रे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज जाधव यांनी केले तर शेवटी आभार सरपंच रणजित जाधव यांनी मानले.