मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
आदिवासी भागातील शाळांतील गरजू मुलांसाठी संगणक शिक्षण सुलभ व्हावे यासाठी जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्था व आयआयकेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'संगणक साक्षरता उपक्रम' राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४१, महापे, अडवली भुतावली येथे संगणक भेट देण्यात आले.
सदर शाळेत अडवली गाव व परिसरातील ५४० विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेमधील संगणक प्रयोगशाळेसाठी सदर संगणक उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी जॉयचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक आखाराम पाखरे, सहशिक्षक भोये सर, पाटील मॅडम, बागडे सर, जॉयचे मंगेश देवकर, हरिकेश बहादूर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेत मुलांसाठी स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा उभारण्याचे नियोजन असून सदर लॅब कार्यान्वित करण्यासाठी संगणकांचा चांगला उपयोग होणार असल्याचे मुख्याध्यापक पाखरे सरांनी सांगितले.
संगणक साक्षरता उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागातील गरजू मुलांपर्यंत संगणक पोहोचवण्याचा उपक्रम जॉयचे अध्यक्ष गणेश हिरवे व आयआयकेअरचे संतोष भोसले यांच्या सहयोगातून राबवण्यात येत असून आगामी काळात अधिकाधिक शाळांपर्यंत संगणक पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे वैभव पाटील यांनी स्पष्ट केले. आजच्या स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान अत्यंत महत्वाचे झाले असून संगणकांच्या अभावी त्या ज्ञानापासून ग्रामीण, दुर्गम व अदिवासी भागातील मुले वंचित राहू नयेत यासाठी सामाजिक दायित्व म्हणून हा उपक्रम हाती घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
मुख्याध्यापक पाखरे सरांनी उपस्थित जॉय सभासदांचे मुलांनी स्वहस्ते तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व जॉय- आयआयकेअर यांच्यामार्फत राबवण्यात येत असलेला संगणक साक्षरता उपक्रम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून याचा निश्चितच फार मोठा लाभ शाळांना होणार असल्याचे नमूद केले. यावेळी शाळेतील शिक्षकांचादेखील जॉय संस्थेच्या वतीने पुस्तके भेट देऊन वैभव पाटील यांनी सन्मान केला.
संगणकांच्या रुपात अत्यंत मोलाचे सहकार्य शाळेला केल्याबद्दल पाखरे सरांनी जॉय संस्था व आयआयकेअरचे आभार मानले.