पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
डॉ. अमिता बिरला (श्री.ओम बिरला मा. अध्यक्ष लोकसभा यांच्या पत्नी) यांनी दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते श्रींचा प्रतिमा, दैनंदिनी व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. अमिता बिरला ह्या श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या निस्सिम भक्त असून, आज त्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहीले. त्यांनी भारताचे नेतृत्व सर्व जगात मान्य होऊ दे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच देशातील सर्व भाविक भक्तांना व नागरिकांना निरोगी व आनंददायी आरोग्य लाभो अशी आराधना केली.
याशिवाय, त्यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन संवर्धन कामाची तसेच भाविकांना देण्यात येणा-या सोई सुविधांची माहिती घेतली. तसेच त्यांनी मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रातील भोजन प्रसादाचा लाभ घेतला व मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या परिवार देवतामधील श्री विष्णूपद मंदिर या ठिकाणीही जाऊन मनोभावे दर्शन घेतल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.