मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज -गुरुनाथ तिरपणकर
सरकारने लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला आहे.
राज्यातील लॉटरी विक्रेत्यांच्या संघटनानी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात एका जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ५५ वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बाबू बंद करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसापूर्वी लॉटरी छपाई बंद केली आहे. आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आल्याने आम्ही प्रसिद्धी माध्यमातून सरकारला आंदोलनाचा इशारा देत आहोत, असे सातार्डेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पेपर व ऑनलाईन लॉटरी विक्रेता युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले की, परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचे कारस्थान का रचले जात आहे ? यामागे सरकारचा काही तरी छुपा डाव आहे. यासाठी आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत. लॉटरी एजन्टचे अध्यक्ष स्नेहल शहा म्हणाले, सरकारने जर महाराष्ट्र राज्य लॉटरीची योग्य प्रकारे जाहिरात केली तर यातून सरकारचा महसूल वाढेल आणि हा व्यवसाय बंद करण्याची सरकारवर वेळ येणार नाही. मात्र सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही हीच खरी शोकांतिका आहे. आज या लॉटरी व्यवसायावर अनेक गोरगरीब, अंध, अपंग, विधवा उदरनिर्वाह करत आहेत.
महाराष्ट्र राज्य लाॅटरी बंदीबाबत विक्रेते,वितरकांची शनिवारी बैठक
महाराष्ट्र राज्य लाॅटरी बंद करण्याच्या चर्चेने राज्यात सध्या जोर पकडला आहे.या पार्श्वभूमीवर संभाव्य लाॅटरी बंदी विरोधात लढा देण्याबाबत राज्यातील लाॅटरी विक्रेते, वितरक हे एकवटले आहेत. त्यांची एक बैठक येत्या शनिवारी २५ जानेवारी रोजी दादर वनमाळी हाॅल येथे सकाळी १० वा. होणार आहे.ही बैठक महाराष्ट्र राज्य लाॅटरी विक्रेता सेनाने आयोजित केली असून ही बैठक संघटनेचे अध्यक्ष विलास सातर्डेकर यांच्या अध्यक्षतेखालील होणार आहे.
महाराष्ट्र राज्य लाॅटरीवर बंदी घालण्याबाबतच्या प्रशासकीय हालचाली पूर्ण झालेल्या आहेत,असा दावा विलास सातर्डेकर यांनी केला आहे.यासंदर्भात एक अभ्यासपूर्ण चर्चा बैठकीत व्हावी,लाॅटरीवर बंदी का नको यावर एक मंथन, चर्चा घडवून आणण्यासाठी ही बैठक आम्ही आयोजित केल्याचे सातर्डेकर यांनी सांगितले.बदलत्या काळात, या स्पर्धेच्या काळात राज्य लाॅटरीने सुध्दा बदलणे आवश्यक आहे.राज्य लाॅटरीत काही बदल, सुधारणा करने गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने राज्य लाॅटरीत काही बदल करण्याबाबत आपल्या सूचना, कल्पना असतील तर
त्या लेखी स्वरूपात लाॅटरी विक्रेते,लाॅटरी वितरकांनी घेऊन याव्यात आम्ही त्याचे वाचन या बैठकीत करु.आणि या सूचना ऐकून घेतल्यानंतर त्यात गरज असेल तर त्यात सुधारणा करण्यात येतील. आणि या सूचना राज्याचे लाॅटरी आयुक्त,राज्याचे वित्त सचिव व अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठवू असे विलास सातर्डेकर यांनी म्हटले आहे.तसेच या बैठकीत संभाव्य लाॅटरी बंदी राज्य सरकारने अचानक आणली तर याला गणमीकाव्याने कसा विरोध करायचा,संभाव्य लाॅटरी बंदी विरोधी आंदोलन कसे करायचे याची रणनितीही या बैठकीत ठरविण्यात येणार आहे.,असे विलास सातर्डेकर यांनी सांगितले.