दि.२७ जानेवारी पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पदवीनंतर ३ वर्षे कालावधी असलेल्या एलएलबी ला प्रवेश घेण्याकरिता प्रवेशपूर्व परीक्षा देणे आवश्यक आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने सदर प्रवेशपूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून एमएएच-एलएलबी-सीईटी- २०२५ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि.२७ डिसेंबर २०२४ पासून ते सोमवार, दि.२७ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच-एलएलबी-सीईटी २०२५ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध केली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले जे विद्यार्थी एलएलबी ला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना शासनाची एमएएच-एलएलबी-सीईटी-२०२५ ही परीक्षा द्यावी लागेल. महाराष्ट्र शासनाने घोषित केल्यानुसार दि. २० मार्च २०२५ व दि. २१ मार्च २०२५ या दोन दिवशी सदर परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि.२७ डिसेंबर २०२४ पासून ते सोमवार, दि.२७ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी प्रवेश परीक्षा नोंदणी शुल्क रु.१०००/- व अनुसूचित जाती-जमातीसाठी रु.८००/- एवढे असून हे नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
या सीईटी परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आयडेंटी साईज एक रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड या बाबी आवश्यक असणार आहेत. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी शासनाचे अधिकृत www.mahacet.org हे संकेतस्थळ पाहवे तसेच स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.