स्वेरीमध्ये ‘अवकाश महायात्रे’ चा समारोप
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘स्वेरीमध्ये ‘विज्ञानभारती’ आणि ‘इस्त्रो ‘यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'स्पेस ऑन व्हिल्स' या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अवकाशातील अदभूत माहितीमुळे विद्यार्थी प्रचंड उत्साही झाले. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून अवकाशातील ग्रह, तारे यांविषयी पुस्तकी ज्ञान मिळत आहेच परंतु या ‘स्पेस ऑन व्हील्स (अंतरीक्ष महायात्रा बस)’ मधील प्रदर्शनामुळे विद्यार्थी आणि अवकाश अजून जवळ आल्यासारखे वाटत होते. या अंतरीक्ष महायात्रेच्या अनुषंगाने आयोजिलेल्या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडली.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर मध्ये ‘विज्ञानभारती’ आणि ‘इस्त्रो' यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस आयोजिलेल्या अंतरीक्ष महायात्रेच्या समारोप प्रसंगी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार ह्या मार्गदर्शन करत होत्या. अंतराळातील महत्वाची माहिती देण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) मोहीम हाती घेतली असून केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इस्त्रोने अंतराळाच्या ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी एक विशेष ‘अंतराळ यात्रा बस’ तयार केली असून बसच्या माध्यमातून चंद्र, सूर्य, ग्रह, तारे जवळून पाहण्याची अनुभूती घेत अंतराळाची वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांना घेता आली. ‘अंतराळ यात्रा बस’मध्ये भारतीय ‘इस्त्रो’ तथा ‘अंतराळ संशोधन संस्था (इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन– इस्त्रो)’ च्या माध्यमातून अंतराळ व त्याअंतर्गत असलेल्या आर्यभट्ट उपग्रह, भास्कर उपग्रह, उपग्रहांच्या अनुषंगाने वातावरणात त्यांच्या फिरण्याच्या किंवा स्थिर राहण्याच्या कक्षा (ऑर्बिट), मंगळ ग्रह, चंद्र, चांद्रयान, ग्रहमालिका, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव, त्यावेळची स्थिती, चांद्रयान व मंगळयान मोहिमांबरोबरच सूर्यकेंद्री कक्षेत अवकाशयान पाठवून सूर्य किरणांमधील अतिनील वर्ण, सौर कण, सौर किरीट, सौर वात, चुंबकीय, सौर किरीट वर्णपट विश्लेषक, अतिनील किरणांची दुर्बीण, चुंबकीय प्रभाव मापक तसेच क्ष-किरण व प्लाझ्मा कण यांचे विश्लेषण, त्यानंतर यशस्वी उड्डाण केलेल्या चंद्रयान-३ ची साहित्य व साधने, उपग्रहांची प्रतिकृती, तसेच चंद्रावरील मृदा, याची ध्वनी क्लिप, चित्रफित, सूक्ष्म उपगृह या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना दिसून आले. अवकाशातील हे सर्व उपगृह, त्यांची सविस्तर माहिती, फलक, भित्तीपत्रके, या बाबी पाहून विद्यार्थी प्रचंड उत्साही झाले होते. सलग दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा लाभ श्री. दर्लिंग विद्यामंदीर चळे, सिताराम महाराज विद्यामंदीर खर्डी, शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूर, दौलतराव विद्यालय कासेगाव, जिजामाता प्रशाला आंबे, आचार्य दोंदे विद्यालय ओझेवाडी, लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव, मातोश्री ईश्वरम्मा विद्यालय पंढरपूर, आपटे उपलप प्रशाला पंढरपूर, मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला पंढरपूर, आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज करकंब, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय मुंढेवाडी, मातोश्री रुक्मिणी गंगाराम होळकर विदयालय व्हळे, यशकिर्ती विद्यालय पंढरपूर, माध्यमिक विद्यालय नेपतगाव, जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी, शांताप्रभू प्रशाला अजनसोंड, कवठेकर प्रशाला पंढरपूर या विद्यालयांतील जवळपास २५०० विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला. यावेळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) तर्फे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. ए.एस.भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या सहकार्याने अवकाश प्रदर्शन संबंधित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध या स्पर्धांचे आयोजन केले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच या दोन दिवसीय प्रदर्शनासाठी ‘विज्ञानभारती’, पश्चिम महाराष्ट्रचे सचिव कौस्तुभ साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमबीए विभागातील विद्यार्थ्यांना एक दिवसीय विशेष प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे प्रदर्शन पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए विभागप्रमुख डॉ.के.पी.गलानी यांच्या नेतृत्वाखाली ५५ विद्यार्थ्यांनी अंतराळ संबंधी अचूक माहिती दिली. ‘अंतराळ यात्रा प्रदर्शन’ यशस्वी होण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी. केने, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम. एस. मठपती, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ.के.बी.पाटील, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
‘
विज्ञानभारती’ आणि ‘इस्त्रो यांच्या सहकार्याने स्वेरीमध्ये आयोजिलेल्या अंतराळ माहितीच्या प्रदर्शनामुळे अवकाशातील कक्षा, उपग्रह, ताऱ्यांची सविस्तर माहिती मिळाली त्याची प्रतिकृती व व्हीडीओच्या माध्यमातून अधिक ज्ञान मिळाले. अभ्यासक्रमात वाचनात आलेले उपग्रह प्रदर्शनाच्या माध्यमातून जवळून पाहता आले. स्वेरीने आयोजिलेल्या या स्पर्धेमुळे ज्ञान आणखी भक्कम झाले.
-नाझिया मुजावर, विद्यार्थिनी, छत्रपती शिवाजी विद्यालय, मुंढेवाडी.