मांजरी प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरीब, दिनदलित, वंचित बहुजनांच्या घरापर्यंत पोहोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात मांजरी हायस्कूल, मांजरी ता. सांगोला विद्यालयामध्ये संपन्न झाला.
22 सप्टेंबर या दिवशी विद्यालय व मांजरी गावांमधून तीर्थरूप अण्णांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक सवाद्य काढण्यात आली. यावेळी विद्यालयांमध्ये मांजरी ग्रामपंचायतचे सदस्य अमृत उबाळे सहपत्नीक यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी सांगोला तालुका पंचायत समितीचे उपसभापती नारायण दादा जगताप, उद्योजक दीपकजी शिनगारे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिकाताई घाडगे पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी, नागरिक उपस्थित होते. या मिरवणूक सोहळ्यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवरती नृत्य करून लेझीम व झांज पथकांच्या माध्यमातून मिरवणुकीमध्ये शोभा वाढविली. मांजरी गावांमधून प्रत्येक कुटुंबांनी त्यांच्या घरापुढे अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केलं व विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी देणगी देण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक. दादासाहेब पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख अंकुश फुले (सर) व विद्यालयातील सर्व सेवक वृंद उपस्थित होता. शेवटी ग्रामपंचायत मांजरी यांचे कडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.