सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
71 वर्षांचे आयुष्य सहानेवर चंदनासारखे अखंड झिजवून बहुजनांना शिक्षणात आणणाऱ्या कर्मवीर अण्णा आम्ही तुमची माफी मागतो. तुमच्या उपकाराची पुढील दहा पिढ्या आम्ही परतफेड करू शकत नाही, हे जरी खरे असले तरी आमच्या या पिढीला माफ करा.... अण्णा तुमची माफी मागण्याचे कारण की, तुमच्या जीवनकार्याला समर्पित एका चित्रपटाला नाकारण्याची सुद्धा आमच्यात लायकी नाही. आजच्या युगात रणबीर कपुरचा ‘अॅनिमल’ सुपरहिट ठरतो मात्र रयतचा वटवृक्ष असलेल्या सातारा या रयतभूमीत ‘कर्मवीरायण’ला दुसरा दिवस काय, दुसरा शो सुद्धा मिळत नाही. अण्णा पुन्हा माफ करा.
शिक्षण केवळ उच्च वर्णियांच्या ताब्यात असताना बहुजनांची लेकरं मूळ प्रवाहात आणण्याची हिंदुस्थानच्या इतिहासातील मोठी किमया भाऊराव पाटलांनी केली. अक्षरश: भिक मागून किंवा मुंबईच्या मंडईत धोतराचा सोगा मांडून भाऊरावांनी रयत शिक्षणची उभारणी केली. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असा लौकिक असलेल्या रयतची उभारणी करत अण्णा कर्मवीर झाले. अन्य पोरांच्या शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवणारी ‘आधुनिक सावित्री’ तथा लक्ष्मीबाई आणि कर्मवीरांचे जीवनचरित्र दृक-श्राव्य साधनेतून मांडण्याचा प्रयत्न झाला. कर्मवीरांच्या जीवनावर पिक्चर काढणे हा काही पैसे कमावण्याचा धंदा नव्हता. पण नव्या पिढीपर्यंत कर्मवीर पोहोचावे हे व्रत घेवून दिग्दर्शक धनंजय बाहुलेकर यांनी चित्रपटाची सहान करून काही महिने आपलं आयुष्य झिजवलं. वर्ष अण्णा सारखेच आपलं आयुष्य सहानेवर उगाळलं.
कर्मवीर विचारांचा किशोर
कर्मवीरांची भूमिका ही केवळ अॅक्टिंग नव्हती. त्याला विचारांची बैठक आवश्यक होती. त्यासाठी किशोर कदम तथा सौमित्र याला पर्याय नव्हता. नेहमीप्रमाणेच किशोरने यात जीव ओतलाय. देविक दफ्तरदार, उदय टिकेकर, अनंत जोग, संजय मोने, उपेंद्र लिमये यांनीही आपल्या आयुष्याचे ‘कर्म’ चित्रपटात झोकून दिले. धनंजय बाहुलेकर याने मुक्तहस्ताने शंकर महादेवन आणि नंदेश उमप यांनाही उधळून टाकले आहे.
चित्रपट नाकारण्याचीसुद्धा आमची लायकी नाही
अद्भूत आणि विलक्षण अशा कर्मवीरांच्या जीवनसंघर्षाला स्पर्श करण्याचे धाडस धनंजयने केलं. प्रत्येक कलाकृती अतिउच्च होईल असे नाही. पण ती अतिउच्च झाली नाही म्हणून ती नाकारावी इतकी सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रात कोणाची लायकी नाही.
कलकी हाऊसफुल्ल, अण्णा फक्त अर्धा शो
कर्मवीर या नावानेच प्रत्येक मराठी माणसाने हा पिक्चर बघावा ही अपेक्षा असली तरी किमान दहा टक्के तरी सत्यात यावी? महाराष्ट्रभर काय घडलं ते जाऊद्या रयतचा वटवृक्ष ज्या भूमीत आहे त्या साताऱ्यात ‘कर्मवीरायण’ला एक दिवसाचे सुद्धा स्थान मिळाले नाही. साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरचे मालक यांनी रयतच्या हातापाया पडून पिक्चर आणला. पण तो पदाधिकाऱ्यांसाठी म्हणून केवळ एक शो चालला. साताऱ्यातील सेव्हन स्टार मल्टीफ्लेक्समध्ये आझाद कॉलेजने 60 तिकिटांसह एक शो बुक केला त्यालाही केवळ 48 लोक आले. इतकं औदासिन्य का?
ही जाहिरात नव्हे विनंती आहे
‘तऊण भारत’मधून हा संताप व्यक्त करताना चित्रपटाची जाहिरात करणे हा उद्देश नाही, हा उद्वेग आहे. अण्णांचे नाव घेतले तरी नतमस्तक होणारा पश्चिम महाराष्ट्र इतका मुर्दाड का झालाय. कर्मवीरांच्या नावाखातर रयतच्या आजी माजी विद्यार्थी-कर्मचाऱ्यांनी या चित्रपटाला प्रतिसाद द्यायला हवा होता. कारण कर्मवीर यासारख्या विषयाला यापुढे कोणीही हात घालणार नाही.
शाब्बास धनंजय, तुझा प्रयत्न आज जरी पूर्ण यशस्वी झाला नसला तरी काळाच्या कसोटीवर तो नक्कीच आजरामर झाला आहे. तुझ्या या प्रयत्नांमुळेच पुन्हा पुन्हा माफी मागतो.
अण्णा आम्हाला माफ करा.
‘कर्मवीरायण’साठी रयत काय करणार?
अण्णांचा जीवनपट उलघडण्याचा प्रयत्न यशस्वी आहे. अण्णांचे जीवनकार्य सातव्या, आठव्या पिढीला त्याच त्याच शब्दातून सांगितले जाते. मग हा नव्वा प्रयोग दहाव्या पिढीला दाखवण्यात रयतला काय हरकत आहे. छोट्या राज्यांच्या शैक्षणिक खर्चापेक्षा दुप्पट खर्च असलेली अतिप्रचंड रयत शिक्षण संस्था अण्णांचे जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काही योगदान देणार का? का वाह-छान छान इतकेच करून थांबणार.
मी जनतेपुढे पसा पसरला आहे : धनंजय भाहुलेकर, दिग्दर्शक
माझ्या आयुष्याचा आदर्श जनतेपुढे यावा म्हणून मी सारं आयुष्य पणाला लावलं आहे. सध्या माझी अर्चना झालीय डोळे मिटून मी पसा पसरलाय. जनतेने किमान आशीर्वाद तरी द्यावा.
माझ्या चेहऱ्यात अण्णा दिसणार हेच भाग्य : किशोर कदम तथा सौमित्र
गेल्या 30 वर्षात माझ्या चेहऱ्यात अनेक पात्रे उभी राहिली. यावेळी अण्णा उभे राहणार हे माझ्या आयुष्याचे सार्थक आहे. नायक म्हणून मी पूर्ण केले. चित्रपटाचे राजकारण झाल्याचे कळते. पण मी अनभिज्ञ आहे.
खास लोकाग्रहास्तव -
पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित "कर्मवीरायण" हा चित्रपट आजपासून अहमदनगर - आशा स्क्वेअर मल्टिप्लेक्स दुपारी 12 वाजता, पंढरपूर - डी वी पी स्क्वेअर सायंकाळी 6 वाजता, लोणंद - के महेंद्र दुपारी 12 आणि रात्री 9 वाजता **येथे प्रदर्शित होत आहे.
अधिक माहितीसाठी आणि अचूक वेळ साधण्यासाठी थेटर मध्ये संपर्क करा