टेंभुर्णी प्रतिनिधी
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील जीर्णोद्धार केलेल्या पुरातन महादेव मंदिरात बुधवारपासून महिनाभर चालणाऱ्या संजय कोकाटे यांचे वतीने आयोजित केलेल्या अतिरुद्राभिषेक उपक्रमाचा प्रारंभ आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व सुविद्य पत्नी सत्यप्रभादेवी यांच्या हस्ते अभिषेक करून करण्यात आला. पहिल्याच दिवशी दिवसभरात शंभर अतिरुद्राभिषेक करण्यात आले.
टेंभुर्णी शहरातून गेलेल्या महामार्गालगत बारवे मळा येथे असलेल्या पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार दोन वर्षापूर्वी करण्यात आला. या मंदिरात ७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत महिनाभर ४००० अतिरुद्राभिषेक करण्यात येणार आहेत. संजय कोकाटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत असून, अतिरुद्राभिषेक करण्यासाठी माढा मतदारसंघातील पती-पत्नी दांपत्यास आमंत्रित करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या परिसरात मंडप उभारून त्यामध्ये होमकुंड निर्माण करण्यात आले आहेत. अभिषेक मंदिराच्या मंडपात तर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात बाहेर उभारलेल्या सभामंडपात होम विधी होत आहेत. सर्व धार्मिक विधीसाठी ४० पुरोहितांचा चमू कार्यरत आहे. अतिरुद्राभिषेक झालेल्या भाविक दाम्पत्यांना संपूर्ण पोशाख, शंभू महादेवाची प्रतिमा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. टेंभुर्णीसह माढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील गावांमधुन दाम्पत्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला असुन पहिल्याच दिवशी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील दाम्पत्यांनी याठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन अतिरुद्राभिषेक सोहळ्यात सहभाग नोंदविला.
जयंत पाटील यांनी घेतले दर्शन
महादेव मंदिरात पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले व महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी वर्गाला चांगले दिवस यावेत आणि सर्वत्र सुख समृद्धी व शांतता प्रस्थापित व्हावी असे साकडे त्यांनी महादेवाला घातले.