सांगोला प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या विभागातून उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. याही वर्षी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सांगोला अधिनस्त कार्यरत असलेले कृषी सहाय्यक समाधान गवळी यांना कृषी विभागांतर्गत गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील व यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्याच्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावचे सुपुत्र असलेले गवळी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी अंतर्गत एमएससी ऍग्री पूर्ण करून २०१४ साली शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी कोकणातील रायगड व सध्या सांगोला तालुक्यातील चोपडी, बंडगरवाडी व पाचेगाव बु या कार्यक्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत.
चालू आर्थिक वर्षांमध्ये कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची उदा- मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना,प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत बियाणे वितरण या सर्व योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याची दखल घेऊन शासनाने उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे.