आमच्या हक्काचे पाणी वेळेवर द्या.. अन्यथा संबधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणू : उत्तमराव जानकर
शेतीच्या पाण्यासंदर्भात विविध मागणीसाठी मोटार सायकल रॅली व रस्ता रोको आंदोलन
भाळवणी प्रतिनिधी
आमचे जे हक्काचे आहे ते द्या... सत्ताधारी राजकीय नेत्यांनी कित्येक वर्षे सत्ता असताना सुद्धा येथील शेतकरी निरा उजवा कालवा शेतीच्या पाण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत आहे, ही खेदजनक बाब आहे. काही कालवा फाट्याचे क्षेत्र वाढवून सत्ताधाऱ्यांकडून आमचे हक्काचे पाणी लाटले जात असून आमचे क्षेत्र कुठे गेले हे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही काय वेगळे नाही जे इतर फाट्याना पाणी मिळेल तेवढेच पाणी आम्हाला द्या. पुढील एक महिन्यामध्ये याची अंमबजावणी नाही केली तर अधिकाऱ्याची कोणतीही गय केली जाणार नाही. आमचे हक्काचे पाणी वेळेवर द्या अन्यथा त्यांना रस्त्यावर आणू असा इशारा अकलूज बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर यांनी दिला.
नीरा उजवा कालवा माचनुर विभागातील शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यासाठी भाळवणी ते वेळापूर मोटार सायकल रॅली व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोटार सायकलला काळे झेंडे लावून व हाताला काळी फित बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. वेळापूर बसस्थानकाजवळ पंढरपूर - पुणे रोडवर ठाण मांडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. याप्रसंगी नागेश काकडे, जयंत शिंदे, नितीन शिंदे, महादेव ताटे, मिलिंद सरतापे, सुरेश देठे, सूत्रसंचलन रणजित सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निवेदनाद्वारे फलटण व माळशिरस उपविभागप्रमाणे माचनुर उपविभागास पाणी मंजूर करण्यात यावा, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्रमांक ४ माचनुर हे नाव बदलून निरा उजवा कालवा वेळापूर उपविभाग हे नाव देण्यात यावे, उपविभाग वेळापूर साठी स्वत्रंत्र पाणी कोटा जाहीर करावा, माळशिरस व फलटण उपविभाग प्रमाणे माचणुर उपविभाग हंगाम निहाय दोन आवर्तन मिळावेत, वेळापूर डी 4 व मायनरचा समावेश नैसर्गिकरित्या माळशिरस विभागात असताना तो माचनुर मध्ये केला आहे तो रद्द करावा, पाण्याच्या आवर्तनापूर्वी म्हणजे मार्च 2024 पूर्वी हे बदल करण्यात यावे तसेच नीरा उजवा कालवा पाणी वाटप सल्लागार समितीमध्ये दोन सदस्य घ्यावेत अशी मागणी नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली. सदर निवेदन वेळापूर शाखा अभियंता स्वप्नील राऊत यांनी स्वीकारले.
या आंदोलनप्रसंगी दीपक गवळी, भगवानराव चौगुले, शशिकांत कदम, विलास पाटील, प्रकाश देठे, पोपट देठे, हरिभाऊ शिंदे, सरपंच रजनीश बनसोडे, महादेव ताटे, उपसरपंच नानासो मुंगूसकर, शेतकरी संघटनेचे सहील आतार, दादा घाडगे, सोपान शिंदे, जगन्नाथ वाघमोडे, रीपाई चे तालुका अध्यक्ष निलेश सरतापे, सरपंच शशिकांत कदम आदी पाणी वापर संस्थेचे सर्व सदस्य व भाळवणी व वेळापूर नीरा उजवा कालवा ब्रांचवरील लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित सरवदे यांनी केले.