नवी दिल्ली प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहे. राजकीय पक्षासह सर्वसामान्य माणूसही निवडणुकीची तारीख कधी जाहीर होईल, याची वाट पाहत आहे. दरम्यान आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सोशल मीडियावर आणि काही माध्यमांवर आल्याने, सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. कारण, 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र दिल्लीतील मुख्य निवडणूक कार्यालयातून हे वृत्त फेटाळले गेले.
दिल्ली निवडणूक आयोगाच्यावतीने जाहीर झालेल्या परिपत्रकासंदर्भात मीडियामधून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले, की लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य तारीख 16 एप्रिल आहे का? यानंतर एका ट्वीटद्वारे स्पष्ट करण्यात आले की, या तारखेचा उल्लेख केवळ अधिकाऱ्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या आराखड्यानुसार कामकाजाचे नियोजन करण्याच्यादृष्टीने करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीची तारीख 16 एप्रिल असण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
व्हायरल होत असलेल्या अधिसूचनेत नेमके काय?
व्हायरल होत असलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की भारताच्या निवडणूक आयोगाने तात्पुरत्या उद्देशाने मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 हा संदर्भासाठी आणि निवडणुकीच्या नियोजनात प्रारंभ आणि शेवटच्या तारखांची गणना करण्यासाठी दिला होता.
दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना ही अधिसूचना जारी करण्यात आली होती आणि त्याचा विषय 'भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन असा हा आहे.
यानंतर थोड्याच वेळात, दिल्लीच्या सीईओच्या कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आणि ती तारीख 'फक्त संदर्भासाठी' होती यावर भर दिला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास नवीन 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन' (ईव्हीएम) खरेदी करण्यासाठी दर 15 वर्षांनी सुमारे 10,000 कोटी रुपये लागतील.