ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी
चिंचणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुर झाली असुन राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यापूर्वी चिंचणी या गावाचा पिराची कुरोली मध्ये समावेश होता. आता शासनाने स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर केल्यामुळे पंढरपूर तालुक्यामध्ये आणखी एका नवीन ग्रामपंचायतची भर पडलेली आहे. चिंचणी या गावाने यापूर्वी ग्रामपंचायत नसतानाही वेगवेगळी ग्रामविकासची कामे करत स्वच्छ सुंदर हरित गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्यामुळे शासनाच्या अनेक पुरस्कारा पासून वंचित राहावे लागत होते. आता हा मार्ग मोकळा होणार आहे. यापूर्वी शासनाच्या वतीने चिंचणीला वनश्री छत्रपती शिवाजी महाराज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात चिंचणी जि.प.प्रा. शाळेचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला होता. या गावाला पर्यटनाचा 'क' वर्ग दर्जा देण्यात आलेला असून लोकसहभाग ,लोकवर्गणी व शासननिधी याचे मदतीने या गावाने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. या पर्यटन केंद्राला पर्यटन संचालनालय यांची मान्यता असुन हे केंद्र गावच्या वतीने चालवले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांपुढे या गावाने समृद्ध गाव ते स्वयंपूर्ण गाव म्हणून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. या सगळ्या नाविन्यपूर्ण कामाची दखल घेत शासनाच्या वतीने चिंचणी या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर केली असून तशी अधिसूचना ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आलेली आहे. यामुळे चिंचणी गावच्या विकासामध्ये आणखी भर पडणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून चिंचणी या गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी पूर्ण होताना दिसत आहे.
चिंचणी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो.चिंचणीची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होणे ही आम्हाला सर्वात आनंद देणारी घटना आहे.यामुळे गावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.
विस्थापित गाव आहे म्हणून फक्त रडगाणे न गाता स्वतंत्र ग्रामपंचायत आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून गावाला समृद्ध व स्वयंपूर्ण करणे हाच आमचा सामुहिक प्रयत्न राहील.आमच्या या प्रयत्नांना
डॉ. भारत पाटणकर आ. बबनदादा शिंदे ,आ.सुभाषबापू देशमुख, ग्रामपंचायत पिराची कुरोली, जिल्हा परिषद सोलापूर,पंचायत समिती व महसुल विभाग पंढरपूर यांचे सहकार्य मिळाले आहे.
मोहन अनपट , चिंचणी.