सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा तुळजापूर रोडवरील शॉवर अँड टॉवर वाटर पार्क येथे पार पडली.
प्रारंभी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व कै. बाबुराव चाकोते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार ,सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, युवा उद्योजक युवराज चाकोते आदी उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कौशल्याचा उपयोग केला पाहिजे.अशा कार्यशाळेतून नवनवीन कौशल्य प्राप्त करता येते.सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे कार्य कौतुकास्पद आहे.
पहिल्या सत्रात प्रा. डॉ.लता बामणे यांनी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर मार्गदर्शन केले. पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणाचे फायदे, अंमलबजावणी व नियोजन यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.अतुल बेलके व प्रा. टाक यांनी विद्यार्थ्यांना कोण कोणत्या माध्यमातून करिअरच्या नव्या संधी देता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये प्रा. डॉ. जयंत करंदीकर यांनी मुख्याध्यापकांचे प्रशासन आणि शालेय कामकाज या संदर्भात माहिती सांगताना मुख्याध्यापकांनी ताणतणावापासून अलिप्त राहून शालेय कामकाज आनंददायी पद्धतीने कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ.अतुल कुलकर्णी यांनी माहिती संप्रेषण याविषयावर मार्गदर्शन केले.शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य विद्यानंद स्वामी यांनी प्रास्ताविकेत मुख्याध्यापक संघाच्या कामकाजासंदर्भात माहिती सांगून भविष्यात आणखीन विविध विषयांवर कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विष्णु गायकवाड व विद्या सचिव गणेश देशपांडे यांनी केले तर रवीशंकर कुंभार यांनी आभार मानले.
याप्रसंगी कार्याध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष अशितोष शहा, उपाध्यक्ष सातलिंग शटगार, उपाध्यक्ष विनोद शिंदे, सहखजिनदार वैजिनाथ हत्तुरे,अंबादास पांढरे ,उज्वला साळुंखे, सर्व पदाधिकारी, शहरातील बहुसंख्य मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.