१०००० हून अधिक होणार सहभागी
मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे निमित्याने कल्याण येथे सलग ३६ तास व एकत्रित १०० तासांचा अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचे आयोजन अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आले आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे वाचननगरी अंतर्गत ना. धो. महानोर आणि साने गुरुजी वाचन कट्ट्यावर १४ ते १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड ११०० हून अधिक कवी , साहित्यिक व वाचक अभिवाचन करणार असून त्यात १०००० हून अधिक रसिक उपस्थित राहणार आहेत.
डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आणि बालक मंदिर संस्था व कल्याण सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने या वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अखंड वाचन यज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून ख्यातनाम मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने , अभिनेता संकर्षण कऱ्हाडे , पै फ्रेंडस लायब्ररीचे पुंडलिक पै , कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ , संशोधक डॉ गंगाधर वारके, यशोदा मालिकेतील बाल कलाकार वरदा देवधर उद्घाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर समारोप सत्रासाठी कुटुंब रंगलंय काव्यात फेम प्रा विसुभाऊ बापट , संपादक डॉ सुकृत खांडेकर, संपादक कैलास म्हापदी , कवी राजन लाखे, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम निमिष कुलकर्णी , डॉ सोपान बुडबाडकर , डॉ आशिष धडस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अखंड वाचन यज्ञ उपक्रमामध्ये वि. दा सावरकर सत्र , वि. आ. बुवा वाचनसत्र , बाबासाहेब पुरंदरे वाचन सत्र , कवी केशवसुत वाचन सत्र , नारायण धारप वाचन सत्र , शांता बाई शेळके वाचन सत्र , वामनदादा कर्डक वाचन सत्र , आण्णाभाऊ साठे वाचन सत्र , भारताचार्य वैद्य वाचन सत्र अशा एकूण ५० हून अधिक सत्रांमध्ये वाचन करण्यात येणार आहे अशी माहिती
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव व संयोजक हेमंत नेहते यांनी दिली. १५ शाळांचे विद्यार्थी हया उपक्रमात सहभागी होत आहे
अखंड वाचन यज्ञ उपक्रमामध्ये कथा , ललित, नाट्य , बालसाहित्य,भयकथा , एकांकिका व आध्यात्मिक साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांचे वाचन करण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी होऊन वाचन सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक वाचकाला सहभाग प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर उपक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.