भिरवंडे प्रतिनिधि
भिरवंडे हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव. याच भूमीत जन्मलेले श्रीकृष्ण सावंत हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व. नेहमीच नव्याचा ध्यास घेतलेले. त्यांच्या सुंदर संकल्पनेतून साकारलेले भिरवडेकर महिला मंडळाचे गणराज आले धरतीवरी हे श्री गणेश गौराई गीत सध्या सगळीकडे गाजते आहे.
श्रीकृष्ण म्हटले की नजरेसमोर येतात त्या 16 सहस्र गोपिका आणि त्यांची रासलीला. आपल्या गावातील गोपिकांना एकत्र आणून गणराजाला घातलेले साकडे साऱ्यांनाच भावते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुणाकडेच वेळ नाही. पण हाती असलेल्या वेळेचे सोने करता येते हे दाखवून दिले आहे श्रीकृष्ण सावंत यांनी. मोबाईलच्या जमान्यात एकमेकांना भेटणे दुरापास्त झाले असतानाच एका अनामिक ओढीने चाकरमानी स्रियाना एकत्र आणून गणराज आले धरतीवरी या गीतातून गौरी-गणपतीला केलेली विनवणी मनोमन भावली.
आपली कोकणची संस्कृती, परंपरा नव्या पिढीला ज्ञात व्हावी या उदात्त हेतूने सावंतांनी जमवलेला गोपिकांचा मेळा अप्रतिमच. गौरी गणपतीसमोर घातली जाणारी झिम्मा फुगडी तर लाजवाबच. .
या वयातील महिलांची चपळता आणि हावभाव निश्चितच कौतुकास्पद. परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम येथे पाहावयास मिळतो. चूल आणि मूल इतपतच असलेले स्त्रीचे मर्यादित आयुष्य आता अमर्यादित झाले आहे. विविध क्षेत्रात स्रिया आता पुरुषांच्या बरोबरीने वावरू लागल्या आहेत. भिरवंडेकर महिलांनी चूल- मूल- नोकरी आणि कुटुंब सांभाळून सांस्कृतिक कार्यक्रमात दाखवलेले कौशल्य लाजवाबच.
सौ. अस्मिता, रंजना, साक्षी, लोरी, सुप्रिया, ज्योती, विशाखा या सावंत भगिनी आणि विशाखा बेर्डे, उज्वला सुकाळी यानी गायिलेले हे गीत यंदा गणेशोत्सवात निश्चितच बहार आणणार यात शंकाच नाही. श्रीकृष्ण सावंत यांचे गीत संगीत आणि ध्वनीमुद्रण मंत्रमुग्ध करणारे. यंदा भिरवंडेकरानाच नव्हे तर गणेशप्रेमीना सावंताच्या संगीताची आगळीवेगळी मैफिल अनुभवयास मिळणार हे नक्की.
सध्या दुर्मीळ होत चाललेल्या जात्यावरच्या ओव्या पुन्हा एकदा कानी पडाव्यात आणि गतकाळचा हा आनंदाचा ठेवा नव्या पिढीला उपलब्ध करून देण्यासाठी सावंत यांनी पुढाकार घ्यावा, अशी आशा व्यक्त करते. त्यासाठी माझ्याकडून सदैव सहकार्य मिळेल.
या गीताचे सर्वेसर्वा श्रीकृष्ण सावंत आणि आमच्या सर्व भगिनींना उदंड आणि उत्तम आरोग्य लाभू दे अशी मी श्री गणेशाचरणी मनोभावे प्रार्थना करते. भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
सौ. विनिता विश्वनाथ राणे, माजी महापौर.