लवकरच सोलापूर हैदराबाद विमानसेवा सुरू होणार.
सोलापूर प्रतिनिधी
गेल्या चार वर्षात सोलापूर विचार मंच तर्फे सातत्याने देण्यात आलेल्या न्यायालयीन व प्रशासकीय लढ्यामुळे १५ जून रोजी विमान सेवेस अडथळा ठरणारी सिद्धेश्वर ची अनधिकृत चिमणी पाडल्या गेली. त्यानंतर सोलापूर विचार मंच तर्फे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया, सोलापूर यांची भेट घेऊन डीजीसीए ,एअरपोर्ट अथोरिटी व नागरी उद्ययन मंत्रालयास सोलापुरातून तातडीने मुंबई ,हैदराबाद, बेंगलोर ,नवी दिल्ली, चेन्नई व तिरुपती या ठिकाणी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यास तत्परतेने आरसीएस- उडान योजनेचे सरव्यवस्थापक अतुल्य अग्रवाल यांनी मेल पाठवून डीजीसी कडून सोलापूर विमानतळास लायसन्स मिळताच सोलापूर ते हैदराबाद ७२ सीटर एटीआर विमानसेवा अलायन्स एअर ही कंपनी देऊ शकते. तसेच इतर ठिकाणांसाठी बाकी कंपन्या आपले प्रस्ताव पाठवतील असे सांगितले होते. त्यानुसार सोलापूर विचार मंचच्या डॉ.संदीप आडके यांनी फ्लाय बिग ,स्टार एअर, अलायन्स एअर, इंडिगो, स्पाइस जेट, गो फर्स्ट , आकासा एअर,विस्तारा अशा कंपन्यांना सोलापुरातून विमान सेवा द्यावी याबाबतचे प्रस्ताव काल पाठवले असता त्यापैकी तातडीने स्टार एयर, फ्लाय बिग व इंडिगो या कंपन्या सोलापुरातून विमानसेवा देण्यास उत्सुक असल्याचे ईमेल त्यांना प्राप्त झाल्याचे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले.
सोलापूर विचारमंच तर्फे होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुद्धा सुरू करावी त्यामुळे विमान कंपन्या तसेच सोलापूरला त्याचा फायदा होईल याबाबतचे मेल आज पाठवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सोलापुरातून बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरू होऊन नाईट लँडिंग फॅसिलिटी सुद्धा सुरू होऊ शकेल.
सोलापूर विचार मंचने सोलापूरची सर्वांगीण उन्नती व विकास होण्यासाठी विमानसेवेची गरज लक्षात घेऊन हा लढा यशस्वी केल्यामुळे आज सोलापुरात विमानसेवा सुरू होण्याआधीच अनेक उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे व एमटीडीसी चे बंद असलेले केटरिंग कॉलेज सुरू होत आहे.

