अध्यक्षपदी कल्याणराव काळे यांच्या निवडीची निश्चीती ?उपाध्यक्षपदासाठी दिनकर कदम, नागेश फाटे, अण्णा शिंदे, भारत कोळेकर यांची नावे चर्चेत.आज होणार निवड
भाळवणी प्रतिनिधी प्रशांत माळवदे
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी आज मंगळवार दि. ११ रोजी कारखाना कार्यस्थवर होणार आहे.. अध्यक्षपदी कल्याणराव काळे यांची निवड निश्चीत मानली जात आहे तर उपाध्यक्षपदासाठी संचालक दिनकर कदम, नागेश फाटे, अण्णा शिंदे, भारत कोळेकर यांची नावे चर्चेत आहेत.
सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून कल्याणराव काळे व श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यात चुरशीने लढत झाली होती. प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडून पंढरपूर तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले होते. यामुळे या निवडणुकीत नक्की कोण जिंकणार या विषयी सर्वत्र चर्चा केली जात होती. निवडणुकीसाठी चुरशीने मतदान होताच दोन्ही पॅनलकडून आपआपल्या विजयाचा दावा करण्यात आला होता.
मात्र कारखान्याच्या सभासदांनी कल्याणराव काळे यांच्याशी निष्ठा ठेवून त्यांच्या पॅनलला बहुमत दिल्याने या निवडणुकीमध्ये काळे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय मिळवला होता. यानंतर आता या कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. आज मंगळवारी या निवडी पार पडत असून निवडीबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली असून आपल्याच नेत्याची वर्णी लागावी यासाठी गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते फिल्डींग लावत आहेत.
दरम्यानं सहकार शिरोमणीच्या अध्यक्षपदी गेली २० वर्षांपासून कल्याणराव काळे हे काम करीत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी पुन्हा त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे. यामध्ये काही संचालकांची नावे पुढे येत असून यापैकी कोणाची वर्णी लागणार हे मात्र आज मंगळवारी होणार्या निवडीनंतर समजणार आहे.
उपाध्यक्षपदासाठी दिनकर कदम यांच्या नावाची चर्चा सुरू असून कल्याणराव काळे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडत आहेत. एक निष्ठावंत विश्वासु व सयमी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ॲड.गणेश पाटील, युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे, रोपळे, तुंगत, बाभुळगाव आदी परीसरामध्ये काळे गट मजबुत करण्यासाठी त्यानी केलेल्या कार्याची पोहच पावती म्हणून त्यांची कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कल्याणराव काळे यांच्या कार्याला साथ देवून काळे गटाची ताकद मजबुत करण्यासाठी सदैव तत्पर असलेले संचालक नागेश फाटे यांचेही नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत असून त्यांना संधी मिळल्यास गादेगाव परीसरातील काळे गटाचे राजकीय वलय अधिक भक्कम करण्याची संधी याव्दारे मिळणार आहे. त्यांच्या असणार्या वरीष्ठ पातळीवरील राजकीय संपर्काचा फायदाही कारखान्याच्या प्रगतीसाठी होवू शकतो. त्यामुळे उपाध्यक्ष पदाची माळ कदाचित नागेश फाटे यांच्या गळयातही पडेल अशी चर्चा आहे.
गटाच्या वरीष्ट नेतेमंडळीच्या अहवानास प्रितसाद देत काळे गटावरील निष्ठा सिध्द करण्यात यशस्वी ठरलेले संचालक अण्णा शिंदे यांच्या नावाची मागणीही उपाध्यक्ष पदासाठी होत असून निवडणुकीमध्ये त्यांनी दाखविलेल्या प्रबळ नियोजनाचे फलीत म्हणून व कल्याणराव काळे यांच्याशी असणारी कट्टर निष्ठा म्हणून अण्णा शिंदे यांच्या नावाला उपध्यक्षपदासाठी अधिकची पसंती मिळताना दिसून येत आहे.
राजकीय समतोल साधण्यासाठी संचालक भारत कोळेकर यांची वर्णीही ऐनवेळी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लागू शकते. गेली अनेक वर्षांपासून भारत कोळेकर हे काळे गटाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांचा असणारा जनसंपर्क हा राजकीय दृष्ट्या काळे गटाच्या पथ्यावर पडत असल्याने त्यांनाही यावेळी उपाध्यक्षपदाची संधी मिळू शकते.

