स्वेरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केली मंदिर परिसराची स्वच्छता
पंढरपूर प्रतिनिधी
सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची स्वच्छता, दुपारी आकाशवाणीने पर्यावरण दिनानिमित्त घेतलेल्या परिसंवादात सहभाग तर सायंकाळी स्वेरी कॅम्पसमध्ये वृक्षारोपण करून स्वेरीने ‘जागतिक पर्यावरण दिन’ विशेष उत्साहाने साजरा केला.
जगभर ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जात असताना परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, ग्रीन टीमचे सल्लागार व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, राष्ट्रीय सेवायोजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.धनंजय चौधरी, ग्रीन टीमचे समन्वयक प्रा.कुलदीप पुकाळे, विभागप्रमुख, विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सहकार्याने संपूर्ण दिवस स्वच्छता, परिसंवादात सहभाग व वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा योजना व अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सकाळी ८:०० वाजता खराटा, पाटी, टोपली, झाडू आदी स्वच्छता संबंधी साहित्य घेवून गोपाळपूर हून पंढरपूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात एकत्रित जमले. पुढे पाहणी करून, नियोजन करून मंदिर परिसर स्वच्छता करण्यास सुरवात केली. कागद, जीर्ण कपडे, केर-कचरा, प्लास्टिक, सुकलेली हार-फुले, निरूपयोगी वस्तू आदी गोळा करून नगरपालिकेच्या कचरा वाहू गाड्यांमध्ये टाकण्यात आला. साधारणपणे दीड तास श्री विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. आकाशवाणीने आयोजिलेल्या पर्यावरण संबंधित परिसंवादामध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. सदर परिसंवादाचे आकाशवाणी वरून प्रक्षेपण करण्यात आले. त्यातून पर्यावरण संबंधी जनजागृती करण्यात आली. सायंकाळी स्वेरी कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संरक्षणाबाबतची जबाबदारी पार पाडण्यात आली. यावेळी विद्यार्थी व संस्थेतील कर्मचारी यांना आपल्या परिसरात झाडे लावण्यासाठी आवाहन करण्यात आले.
यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे डॉ.श्रीकृष्ण भोसले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे प्रा. अविनाश मोटे, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, डॉ. विद्याराणी क्षीरसागर, प्रा. सचिन गवळी, प्रा.दिग्विजय रोंगे, प्रा. प्रदीप मोरे, संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा.अमरजित केणे, प्रा.एस.एम. शिंदे आदी उपस्थित होते. स्वेरी अभियांत्रिकीतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’ चे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने परिश्रम घेतले.