विशेष लेख
भारत एक विकसनशील देश असून विकसित देशाचे स्वप्न प्रत्येक भारतीयांना सध्या पडत आहेत.परंतु ही स्वप्ने पुर्ण करण्यासाठी कणखर, स्वयंप्रेरणेने, गाव प्रकाशित करणारे गावचे मुखिया तयार होणे गरजेचे आहे.प्रशासनातील इत्यंभूत माहिती घेऊन त्याची जमीनीवर अंमलबजावणी करण्याची ताकद असणारे मुखिया तयार होणे व असे मुखिया गावकऱ्यांनी तयार करून त्याच्या पाठीवर ताकद निर्माण करणे काळाची गरज आहे.
फक्त त्या मुखियाला विकासाची नस कळणे गरजेचे आहे. विकास कामांची अंमलबजावणी करण्याचे धारिष्ट्य त्या मुखियात असेल काही दिवसात त्या गावाचा कायापालट झालेला दिसेल.
पहिले त्या मुखियाने गावातील शिक्षण व्यवस्थेवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत चांगले शिक्षण कसे पोहचेल याची तळमळ असणारा मुखिया असावा. गावात उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले तर गावातील अनेक मुले प्रशासनात जातील. त्यांच्या अनुभवाचा फायदा गावाला होऊन प्रशासन चालवण्याचे बारकावे गावच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील. त्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याखाने आयोजित करणारा मुखिया असावा. गावात धार्मिक स्थळे व बंद अवस्थेतील समाज मंदिरे उभा करण्यापेक्षा जागतिक दर्जाचे भव्यदिव्य ग्रंथालये उभा करणारा मुखिया असावा.शिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यायाम शाळा माझ्या गावात उभी राहिली पाहिजे या विचारांचा व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे धारिष्ट्य दाखवणारा असावा. गावात व्यायामाचे साहित्य,प्रत्येक खेळ व त्यातून चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा असावा.
गावातील प्रत्येक वाडी वस्ती वर विद्युत पुरवठा गेला आहे की नाही ते पाहून तेथील प्रशासनावर उत्तम कमांड असणारा मुखिया असावा.गावातील विविध ट्रांसफार्मर व त्यातील फ्युज चांगल्या दर्जाच्या आहेत का. याची वारंवार तपासणी करणारा असावा.त्यासाठी प्रशासनाला धारेवर धरून त्यांच्याकडून प्रेमाने काम करून घेणारा असावा.
गावात न्याय निवाडा करताना पक्ष पार्टी बाजूला ठेवून न्यायाच्या बाजूने लढणारा, सामान्यांच्या हृदयात अंतरप्रवेश करणारा, सुसंस्कृत मुखिया असावा.
स्वच्छ,सुंदर व निर्मल ग्राम करण्यासाठी
गावात चांगल्या दर्जाची स्वच्छता गृहे,कचरा डेपो तसेच पावसाळ्यापूर्वी गावातील गटारांची योग्य ती देखभाल घेऊन माझ्या गावात होणारे संभाव्य संसर्ग जन्य रोग टाळण्यासाठी प्रयत्न करणारा असावा.गावातील ड्रेजेन सिस्टीम उत्तम कशी राखली जाईल. याची काळजी व दखल घेणारा असावा.
गावातील शेतशिवारापर्यत चांगले रस्ते निर्माण करण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मुखिया मुखिया गावा- गावात तयार होणे गरजेचे आहे.
गावातील गोरगरीबांच्या अडचणी समजून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ योग्य त्या व्यक्तीलाच मिळतोय का याची खडानखडा माहिती घेऊन प्रशासन त्यात हाची काळेबेरे करीत असेल तर प्रशासनाचा त्याच वेळी कान पकडून योग्य त्या व्यक्तीपर्यंत लाभ कसा पोहचेल याची भान असणारा मुखिया असावा.
गावातील प्रत्येक लोकांना तो आपला हक्काचा माणूस आहे असे वाटणारे निःपक्ष पाती मुखिया गावा गावात तयार होणे गरजेचे आहे.
त्यांना उत्तम प्रशासन चालवता आले पाहिजे, तंत्रज्ञान आणि विकास यंत्रणा यांचा मेळ घातला आला पाहिजे.गावची आरोग्य यंत्रणा कशी चांगली ठेवता येईल याची काळजी घेणारा असावा.गावात युवा व वृध्दांना करमणुकीची केंद्रे उभा करणारा मुखिया असावा.गावातील शिक्षण व्यवस्थेवर घारीच्या नजरेप्रमाणे नजर असावी.स्रीयाना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा भरणारा जर आमचा,गावचा, जिव्हाळ्याचा मुखिया तयार झाला गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.
शेवटी येवढेच गावातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात मोठ्या झालेल्या असतील अशा व्यक्तींना गावात सुधारणा करण्यासाठी गावात बोलवून त्यांचा मानसन्मान करून त्याच्या अनुभवाचा फायदा गावाला कसा मिळेल यासाठी वारंवार प्रयत्न करणारा मुखिया असावा.
बसं प्रत्येक गावातील मुखियाने फक्त एक वर्षासाठी फक्त प्रयत्न म्हणून प्रयोग करून पाहावा.याचे रिझल्ट डोळे दिपवणारे नक्कीच असतील.
आनंद आलदर