मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या बी.एड प्रवेश सी.ई.टी. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ह्या परीक्षेमध्ये कु श्वेता शेट्टीगार, ह्या विद्यार्थिनीने १५० पैकी १२९ गुण मिळवत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात बी. एड. महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे दर वर्षी बी.एड. सी. ई टी. परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ह्या परीक्षेसाठी श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे प्रत्येक वर्षी बी.एड. व एम.एड.सी. ई टी परीक्षेसाठी खास मार्गदर्शन करण्यात येते.
कु.श्वेता शेट्टीगार सोबत अनेक विद्यार्थ्यांनी ह्या सी. ई टी. परीक्षेसाठी महाविद्यालयाच्या ह्या मार्गदर्शन वर्गामध्ये सहभाग नोंदवला होता. ह्या मार्गदर्शनाचा अत्यंत उपयोग झाला असून या मार्गदर्शनामुळेच मला हे यश प्राप्त झाले असे श्वेता हीने महाविद्यालयाच्या प्राचार्य अॅड. डॉ. सीमा कांबळे यांच्याशी बोलताना सांगितले व त्यांचे आभार मानले.
श्वेता हिने प्राप्त केलेल्या यशाबद्द्दल आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते यांनी कौतुक केले आहे व तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाने अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थी विकासासाठी कटीबद्द रहावे असे सांगितले.