नवी मुंबई प्रतिनिधी
नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्री गणेश सभागृहात रंगधनु प्रकाशन आयोजित, सुप्रसिद्ध कवी, लेखक गजआनन म्हात्रे यांनी लिहिलेल्या खाडीवरची माडी - एक प्रेम कथा या कादंबरीचा प्रकाशन सोहळा दिनांक १८ मे २०२३ रोजी, ज्येष्ठ कवी प्रा. एल. बी. पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात पार पडला. सुप्रसिद्ध गायक, लेखक प्रमोद कर्नाड यांची साक्षेपी प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे.
या प्रकाशन सोहळ्यास सिडको कामगार युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल, ज्येष्ठ साहित्यिका सुनीता जोशी व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर तसेच पदाधिकारी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाशन समारंभात बोलताना गजआनन म्हात्रे यांचे बालमित्र नीलेश तांडेल म्हणाले की, कोवळ्या वयात आणि तारुण्यात आल्यावरदेखील प्रेम प्रकरणांची बाधा न झालेल्या साध्या, सरळमार्गी गजआनन म्हात्रे यांनी कोवळ्या प्रेमावर कादंबरी लिहावी हे आश्चर्यजनक आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. एल. बी पाटील यांनी तोच धागा पकडून सांगितले की कुठलाही लेखक अनुभवसिद्ध लेखन करीत असतो. गजआनन म्हात्रे हे छुपे रुस्तूम असावेत, कारण प्रत्यक्ष अनुभव असल्याशिवाय कोवळ्या प्रेमावरील इतकं, जिवंत, रसरशीत आणि प्रत्ययकारी लिखाण ते कसं करू शकतील ? असं आपलं निरीक्षण नोंदवले. गजआनन म्हात्रे हे आत्मकेंद्री लेखक नाहीत, विविध विषयांवरील त्यांचे काव्य व इतर लेखन नेहमीच समाज मनाचा कानोसा घेणाऱ्या आरशासारखे चित्रदर्शी असते. ते आपल्या लेखनातून सामाजिक प्रश्नावर सातत्याने भाष्य करीत असतात तसेच त्यांनी विविध वाड्.मय प्रकार लीलया हाताळले आहेत; त्यामुळे मी त्यांना नवी मुंबईतील एक महत्त्वाचा लेखक मानतो; असा त्यांचा गौरवपूर्ण केला.
सुनीता जोशी यांनी कादंबरी वाड्.मय प्रकाराची महत्त्वाची वैशिष्ट्ये विषद करून गजआनन म्हात्रे यांनी कादंबरी या अवघड मानल्या गेलेल्या वाड्.मय प्रकारातही मुशाफिरी करावी हे खरोखरीच त्यांच्यासाठी कौतुकास्पद आणि आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे असे सांगून गजआनन म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुचित्रा कुंचमवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्कृष्टपणे केले.