पंढरपूर प्रतिनिधी
राज्यातील व राज्याबाहेरील कलाकारांचे व कलाप्रेमी शिक्षकांचे 2 रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन स्वेरी कॉलेज पंढरपूर येथे साजरे होणार असून , त्यामध्ये विविध कलाविष्कार पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे,अक्षरमित्र अमित भोरकडे व स्वागताध्यक्ष प्रशांत वाघमारे यांनी केले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव कैलास बिलोनीकर भूषविणार आहेत.
माझी शाळा माझा फळा समूह व स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 मे ते 28 मे 2023 रोजी साजऱ्या होणाऱ्या 2 ऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलन महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील जवळपास 300 कलाकार सहभागी होणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 26 मे रोजी होणार असून त्यावेळी प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, ग्राहक संरक्षण आयोग पुणे चे माजी न्यायाधीश ओंकार पाटील, मुंबई येथील ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे, होप फाउंडेशन महाडचे नरेंद्र महाडिक व सर्व ज्येष्ठ अक्षर मित्र सहभागी होणार आहेत.
याच दिवशी व्यक्ती चित्र रेखाटनचे प्रात्यक्षिक देव हिरे नाशिक, मेघा बोरसे औरंगाबाद, संदेश पवार पुणे, मोहम्मद बागवान उस्मानाबाद सादर करणार आहेत. संमेलनाचे वैशिष्ट्य असणारी पोट्रेट रांगोळी व थ्री डी प्रतिबिंब रांगोळी महादेव गोपाळे मुंबई, सोमनाथ भोंगळे; पूनम पोटे; अंजली कदम पुणे, मल्लिनाथ जमखंडी सोलापूर, समीर चांदरकर सिंधुदुर्ग साकारणार आहेत.
शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी मुंबई येथील ज्येष्ठ सुलेखनकार अनिल गोळवलकरांचे कॅनव्हास कॅलिग्राफी व पेपर रोल कॅलिग्राफी सादरीकरण होणार आहे. त्यानंतर वैयक्तिक कलेचे सादरीकरण हेमंत घरत मुंबई, अर्पित पोद्दार नागपूर, सचिन सावंत मुंबई, सूर्यकांत वाघमारे जळगाव, श्रीकांत गवांडे मुंबई हे सादर करणार आहेत. त्यानंतर लाईव्ह स्केच मोहन शिरूरकर अमरावती व गणेश माने पुणे करणार तसेच कॅरी केचर शरण अळीमोरे सोलापूर सादर करणार आहेत. राष्ट्रीय रेकॉर्ड केलेली अकोला येथील दुसरी शिकणारी पूर्वा बगळे ही गणेश शिल्प साकार करणार आहे.
याच दिवशी दुपारी लेखन साहित्य खरेदी-विक्री केली जाणारा असून सायंकाळी वैशिष्ट्यपूर्ण असे छत्री वरील सुलेखन सतीश उपळावीकर कोल्हापूर, प्राणजित बोरसे औरंगाबाद, रामराव भगत पुणे, मोहित पवार पुणे, सूर्यकांत वाघमारे जळगाव, प्रमोद देठे सांगली साकारणार आहेत. रोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक 28 मे रोजी सकाळी गालिचा व अक्षर रांगोळीचे प्रात्यक्षिक गणेश माने पुणे, अक्षरमित्र अमित भोरखडे सोलापूर, गायत्री पाटील पुणे साकारणार आहेत. दुपारी विविध कलेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व आदर्श कामगिरी केलेल्या कलाकारांचा अक्षर सन्मान सोहळा होणार असून त्यावेळी संमेलनाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव कैलास बिलोनीकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुभाष बापू देशमुख ,आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम सातपुते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत पाटील, महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, डॉटर मॉम फाउंडेशनच्या शितलदेवी मोहिते पाटील,डायट पुणेचे जेष्ठ अधिव्याख्याता विकास गरड, प्राथमिकचे शिक्षण अधिकारी संजय जावीर, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाड उपस्थित राहणार आहेत.
या अक्षर संमेलनाची उत्सुकता महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना असून ते सहभागी होणार आहेत. पंढरपूरकरांनीही या सर्व कलांचा आस्वाद घेण्याचे व संमेलनाची लिंक भरून सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व अक्षर मित्र अमित भोरकडे, स्वागताध्यक्ष प्रशांत वाघमारे यांनी केले आहे.