सांगली प्रतिनिधी
कवठेपिरान येथे शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मगदूम यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी कुटुंबीयांना मारहाण करीत दोन लाखांच्या रोकडसह 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटले.या घटनेने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरोडय़ाची माहिती समजताच सांगली ग्रामीण पोलिसांसह एलसीबी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कवठेपिरान रस्त्यावर रफीक दस्तगीर मगदूम यांचे एका गल्लीत घर आहे. त्यांची मुलगी तरन्नूम शिफा मुजावर नातेवाईकांच्या लग्नासाठी माहेरी आली आहे. मगदूम यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी बँकेतून रोख रक्कम काढून घरात ठेवली होती. शिवाय मुलगी तरन्नूम दागिने घेऊन माहेरी आली आहे. घराचे बांधकाम सुरू असल्याने शेजारीच झोपडीवजा घरात मगदूम कुटुंब राहतात.
गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन दरोडेखोर मगदूम यांच्या घरात घुसले. यावेळी झोपेतून जागे झालेल्या मगदूम कुटुंबीयांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटय़ांनी त्यांना दगडाचा धाक दाखवत गप्प बसवले. त्यानंतर मगदूम कुटुंबीयांना मारहाण करीत घरातील दोन लाखांची रोकड आणि तरन्नूमचे 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटले. दरम्यान, दोघे दरोडेखोर घरात लूट करीत असताना त्यांचे दोन साथीदार घराबाहेर थांबले होते. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तरन्नूम जखमी झाल्या आहेत.
दरोडय़ाची माहिती मिळताच सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर जिह्यात नाकाबंदी करून चोरटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. घटनास्थळी ठसेतज्ञ आणि श्वान पथकाने चोरटय़ांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.