मंदिरातील सी सी कॅमेरातील चित्रात भाविक द्राक्ष घेताना
पंढरपूर प्रतिनिधी
शुक्रवार, दिनांक 3 मार्च, 2023 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आलेल्या द्राक्षाच्या सजावटीच्या अनुषंगाने दर्शनरांगेतील भाविकांनी प्रसाद म्हणून सदर द्राक्ष खाल्ल्याची वस्तुस्थिती असताना तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांनी भाविकांना सदर द्राक्षांचे वाटप केल्याची वस्तुस्थिती असताना गैरसमजातून काही वर्तमानपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये याबाबत चुकीचे वार्तांकन प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिल्यानंतर सदरची वस्तुस्थिती स्पष्ट झालेली असून त्यात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रकारचा गैरप्रकार नसल्याची बाब सिद्ध झालेली आहे.
तथापि, अशा प्रकारच्या वार्तांकनामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत व देवस्थानाबाबत कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश समाजामध्ये जाऊ नये. याकरिता कोणत्याही बातमीची शहानिशा करून, नंतरच वृत्त प्रसिद्ध करावे. त्या अनुषंगाने कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना केले आहे.
तसेच या बातम्यांच्या अनुषंगाने मंदिर समितीतील 44 कर्मचाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या असेही वृत्त एका वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, माहे डिसेंबर, 2022 मध्ये मंदिर समितीच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या नियमित होत असलेल्या बदल्यांच्या पद्धतीनुसार यावर्षी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला होता. तथापि, मंदिर समितीच्या सर्व विभागांचे काम समन्वयाने व सुरळीतपणे व्हावे. याकरिता सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा व त्यांच्या अनुभवाचा विचार करून बदल्यांचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच मंदिर समितीच्या सर्वच कर्मचाऱ्यांना मंदिर समितीच्या विविध विभागांचे कामाबाबत माहिती व्हावी तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांना त्या त्या विभागाच्या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा ज्ञात असेल तर काम करायला सुलभता निर्माण होईल. या दृष्टिकोनातून मागील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता व दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेऊन, मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणानंतर मंदिर समितीच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच इतर कर्मचारी यांचा यापूर्वीचा कामाचा अनुभव व आज रोजी ची विविध विभागातील कर्मचाऱ्यांची असलेली आवश्यकता या दोन्ही बाबींचा विचार करून तयार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन, सदरच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या बदल्या या कर्मचाऱ्यांची निष्क्रियता अथवा कर्मचाऱ्यांचे आंदोलन या कोणत्याही गोष्टीच्या पार्श्वभूमी वरती केलेल्या नसून नियमित केल्या जाणाऱ्या प्रशासकीय बदलांच्या पद्धतीनुसार सदरच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच विभाग प्रमुख संवर्गातील कर्मचा-यांनंतर इतर कर्मचा-यांना कामाची माहिती होणे व त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी तसेच कार्यालयीन कामकाज गतीमान करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागासाठी आवश्यकतेनुसार लिपीक व लिपीक समकक्ष संवर्गातील कर्मचा-यांस योग्य त्या अटी व शर्तीवर सहायक विभाग प्रमुख पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
या पुढील कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचा कारभार अधिक प्रभावी आणि भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने अधिक गुणवत्ता पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कर्मचारी प्रशिक्षण तसेच कामकाज आढावा, तंत्रज्ञानाचा वापर या सर्व बाबींचा वापर करून येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा मानस असल्याचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले.