बार्शी प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील खांडवी येथील जिजाऊ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात दि. १४ ते १६ फेब्रुवारी रोजी सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्काऊट-गाईड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सुमारे १५०० कब - बुलबुल व स्काऊट -गाईड उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी नियोजनाच्या निमित्ताने बार्शीचे गटशिक्षणाधिकारी तथा समिती अध्यक्ष राजकुमार तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी जिल्हा मुख्यालय आयुक्त तथा माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त शंकर यादव ,कब ट्रेनर रशीद पठाण,जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्हा गाईड संघटक अनुसया शिरसाठ, पुराणिक, अखंडेकर, विश्वास लिंगराज, बंडू बंडगर,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा वर्षाताई घाडगे,प्रशासन प्रमुख किशोर कदम,प्राचार्य विजय केसरे, मुख्याध्यापिका राजश्री राऊत आदी उपस्थित होते.
या सहविचार सभेत स्काऊट- गाईड जिल्हा मेळाव्यासंबंधी पूर्वतयारी, नियोजन, विविध समित्या, जबाबदारी वाटप आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.राजर्षि शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव घाडगे-पाटील यांनी मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध संयोजन समित्या स्थापन करण्यात आल्या.
तीन वर्षांनंतर जिल्हा मेळावा
कोरोना महामारीमुळे तीन वर्षाच्या कालखंडानंतर जिल्हा स्काऊट मेळावा संपन्न होत आहे.स्काऊट गाईड हे चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्याचे उत्तम संस्कार केंद्र आहे. स्काऊट-गाईड समाजात आदर्श नागरिक घडवण्यात महत्वाची भूमिका बजावत असते तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप यांनी केले