पंढरपूर प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा कॉम्पोनंट आठ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने ‘प्रयोगरूप लोककलांचे बदलते स्वरूप’ या विषयावर शनिवार दि. ११ फेब्रुवारी
रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे हे करणार आहेत.
या चर्चासत्रात बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. विश्वनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र एकूण सहा सत्रात संपन्न होणार आहे.
पहिल्या सत्रात ‘कीर्तन लोककला : बदलते स्वरूप’ याविषयावर बेळगाव येथील राणी चन्नमा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे हे मार्गदर्शन करणार असून संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुहास पुजारी हे सत्राध्यक्ष असणार आहेत. दुसऱ्या सत्रात ‘जागरण गोंधळ : बदलते स्वरूप’ प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ. रणधीर शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्ष म्हणून गोवा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. सुनिता उम्रस्कर उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात ‘प्रयोगरूप लोककला : रंगाविष्कार’ या सत्रात कीर्तन, भारुड व लावणी या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ येथील प्रा. डॉ. शिवाजी वाघमारे, सौ. संध्या साखी पंढरपूर व मनोहर तथा छबूराव उत्पात हे उत्पातांच्या लावण्यांचे सादरीकरण करणार आहेत.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी श्रीसंत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथील प्रा. डॉ. नानासाहेब सूर्यवंशी हे असणार आहेत. चौथे सत्र हे खुल्या निबंध वाचनाचे असणार आहे. या चर्चासत्राच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे असतील.
या चर्चासत्रासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर, मुंबई विद्यापीठ मुंबई कार्यक्षेत्रातील मराठी साहित्य आणि लोकसाहित्याचे प्राध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, संशोधक व तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. राजाराम राठोड, प्रा. डॉ. रमेश शिंदे, प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. डॉ. म्हाळाप्पा कांबळे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, शिवाजी लोभे, सुरेश मोहिते, अभिजित जाधव, समाधान बोंगे,अमोल माने, ओंकार नेहतराव, महेश सोळुंखे आदी सेवक परिश्रम घेत आहेत. अशी माहिती चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. चांगदेव कांबळे यांनी प्रसिद्धीला दिली आहे.