हातभट्ट्यांवरही धडक कारवाई
रु.४लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी (ता.५ जानेवारी) सोलापूर शहरातील भुलाभाई चौक येथे एका आटोरिक्षातून वाहतूक होणारी अडीचशे लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे, तसेच सकाळच्या सत्रात मुळेगाव तांडा, कवठे तांडा, भोजप्पा तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून ७६० लिटर हातभट्टी दारु व १४ हजार नऊशे लिटर गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक सुनिल पाटील यांच्या पथकाने सकाळी ६ वाजेच्या सुमारास बोरामणी नाका ते कन्ना चौक रोडवरील भुलाभाई चौक येथे बजाज कंपनीच्या तीन चाकी रिक्षा क्र. MH-13- CT -0209 या वाहनातून पाच रबरी ट्यूबमध्ये साठवून वाहतूक करीत असतांना अडीचशे लिटर हातभट्टी दारु जप्त केली. वाहनाचा चालक अनिल रामा राठोड, वय ३६ वर्षे, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर याचे ताब्यातून रु.१३ हजार किंमतीच्या हातभट्टी दारु व वाहनासह एकूण ९३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक अ विभाग, ब विभाग, सीमा तपासणी नाका व भरारी पथक कार्यालयाने सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा, कवठे तांडा व भोजप्पा तांडा येथे धाड टाकून गुळमिश्रित रसायनापासून हातभट्टी दारु तयार करणा-या ठिकाणांवर कारवाई केली. तसेच मुळेगाव तांडा येथील घरांची झडती घेतली असता त्याठिकाणी घरात प्लास्टीक बॅरेलमध्ये गुळमिश्रित रसायन व रबरी ट्यूबांमध्ये हातभट्टी दारु लपवून ठेवल्याचे आढळून आले.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ गुन्हे नोंदवले असून ७ आरोपींना अटक केली असून ४ आरोपी फरार आहेत. त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून ७६० लिटर हातभट्टी दारु व १४ हजार नऊशे लिटर गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे. या कारवाईत निलेश तोळाराम पवार, धनाबाई रवी चव्हाण, अमोल भोजू पवार, रत्नाबाई सोमनाथ राठोड, मिनाक्षी शाखा पवार, शालूबाई धनु राठोड, सर्व राहणार - रा. मुळेगाव तांडा (ता. द.सोलापूर) व रुतूबाई हनमंत चव्हाण, राह. गोविंद तांडा, कवठे यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, गुलाब जाधव, सुनिल कदम, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, मानसी वाघ, गणेश उंडे, सुनिल पाटील, सुरेश झगडे, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, सिद्धराम बिराजदार, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, प्रकाश सावंत, नंदकुमार वेळापुरे, प्रियंका कुटे व वाहनचालक रशिद शेख व मारुती जडगे यांनी पार पाडली.
सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून तस्करी होणा-या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच रात्रंदिवस सदर पथकाद्वारे पाळत ठेवण्यात येत असून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन धार्मिक यांनी केले आहे.