पंढरपूर प्रतिनिधी
"नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी आणि समाजाच्या हितासाठी आहे. त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची प्राध्यापक आणि शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. संपूर्ण जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे. त्यामुळे या धोरणातील त्रुटी दूर करून आपणास हे धोरण यशस्वीपणे राबवायचे आहे." असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व रूसा अंतर्गत आयोजित 'नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी' या विषयावरील व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, प्राचार्य डॉ सुरेश ढेरे, प्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ.लतिका बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के पुढे म्हणाले की, "नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे आपण सर्वांनीच समजून घेतले पाहिजे. या धोरणाबाबत पुरेसा अभ्यास न करताच अनेकजण प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात पदवी मिळण्यासाठी चार वर्षाची तरतूद केली असली तरी पूर्वीची तीन वर्षात पदवी मिळणारी व्यवस्था अद्यापही सुरूच राहणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबवताना स्वायत्त महाविद्यालयांना सोपे जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्याला अधिक चांगले अभ्यासक्रम देता येतील." अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, "शैक्षणिक क्षेत्रात होणारे परिवर्तन हे अटळ आहे .या बदलास सामोरे जाण्यासाठी शाळा महाविद्यालय आणि शिक्षक प्राध्यापकांनी तयारी केली पाहिजे. जागतिक क्षेत्रात आपणास प्रभावी नेतृत्व करण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांनी अधिक गतिमान होण्याची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. या कार्यक्रमास कला व वाणिज्य महाविद्यालय माढा, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर, माणदेशी महाविद्यालय जुनोनी आदी महाविद्यालयातील प्राध्यापक, सीनियर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम, बी. व्होक, बी.सी. ए., इ.सी. एस. या विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य प्रा. राजेंद्र मोरे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. सुशील शिंदे यांनी मानले.