पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
“मार्मिक संवाद दीपावली विशेषांक - २०२६ म्हणजे खऱ्या अर्थाने मातृत्वाच्या मायेचा, स्नेहाचा, आठवणींचा आणि दिवाळीच्या भावविश्वाचा साहित्यिक आविष्कार आहे. ” असे मत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.
ते मार्मिक संवाद प्रकाशनच्या माध्यमातून ‘आई, मी आणि दिवाळी…’ या हृदयस्पर्शी विषयावर आधारित दीपावली विशेषांक - २०२६ च्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
मार्मिक संवाद प्रकाशनच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी 'आई, मी आणि दिवाळी...' हा विषय घेऊन दीपावली विशेषांक प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. कैलाश करांडे, कवी रवि पुष्पा वसंत सोनार, कवी सचिन कुलकर्णी, प्रा. डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवाळी आणि आई यांचे नाते प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे आहे. आईच्या हातचा फराळ, बालपणीच्या आठवणी, आईने केलेले संस्कार आणि तिच्या मायेची ऊब याविषयी पंधरा मातृभक्त मान्यवरांच्या भावविश्वाला ‘आई, मी आणि दिवाळी…’ या विशेषांकातून लालित्यपूर्ण शब्दरूप देण्यात आले आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात आईच्या आठवणींना उजाळा देणारा आणि मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा साहित्यिक उपक्रम वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा ठरत आहे. मार्मिक संवाद प्रकाशनने सलग तिसऱ्या वर्षी हा विशेषांक प्रकाशित करून साहित्यविश्वात एक वेगळी परंपरा जपली आहे. आईच्या मायेचा सुगंध आणि दिवाळीच्या गोड आठवणींचा संगम असलेला मार्मिक संवादचा हा विशेषांक साहित्यप्रेमींसाठी भावनिक आनंदाची पर्वणी ठरत आहे. पंढरपूर आणि परिसरातील तसेच महाराष्ट्रातील अनेक मातृभक्त व मराठी साहित्य रसिक यांना दिवाळी फराळाबरोबर मुखपृष्ठावर मातोश्री सुलोचना जगन्नाथ करांडे यांचे अतिशय सुंदर व समर्पक असे छायाचित्र असलेल्या व पंढरपूर येथील मातृभक्त मा. डॉ. मारुती नवसाबाई रामा टकले यांच्या अतिथी संपादनातून साकारलेल्या आहेत.
तसेच शशिकांत जगन्नाथ करांडे (कडेगाव - सांगली), अरुण मारोतीराव मिरगे (माजलगाव), संजय धोंडीबा देशमुख,मनिषा श्रीपाद कुलकर्णी, निशिकांत प्रल्हाद परचंडराव, नंदकुमार वासुदेव कुलकर्णी, रणजीत भारत जगताप, अवंतिकाताई उन्मेष बागल, रजनीताई अरविंद जाधव, प्रा. नागेश उद्धवराव सिंघण, प्रा. डॉ. भारत कृष्णा गायकवाड, प्रतिभा भाले (पुणे), सुनील दत्तात्रय कोरे, शिवाजीराव धोंडीबा वाघमारे, दादासाहेब खरात या मान्यवरांचे वैशिष्ट्यपूर्ण साहित्य असणाऱ्या मार्मिक संवादच्या दिवाळी अंकाची मेजवानी मिळणार असल्यामुळे विशेष उत्साही वातावरण आहे.
मार्मिक संवाद प्रकाशनच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी 'आई, मी आणि दिवाळी हा विषय घेऊन अतिशय अविस्मरणीय व सुंदर असा दिवाळी अंक प्रकाशित केल्याबद्दल सविता रवि सोनार व कवी रवि वसंत सोनार यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

