सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट्स या कामगार संघटनेच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या पुढाकाराने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. स्टेट युनियनचे अध्यक्ष माननीय श्रीनिवास गुंडारी आणि सचिव माननीय प्रमोद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, स्टेट युनियनचे खजिनदार दयानंद ममड्याल, सौ. रेणुका बुधाराम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार नागेश श्रीचिप्पा, श्रीनिवास नक्का, सौ. सपना कांबळे, गौतम कडदास, तेजस ममड्याल, श्रीमंत वाडीकर आदी पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्टेट युनियनचे खजिनदार दयानंद ममड्याल यांनी संघटनेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. पत्रकारांनी संघटनेसोबत एकजुटीने राहून तिची व्याप्ती आणि ताकद वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष विजयकुमार बाबर यांनी पत्रकारितेत प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विषयाची योग्य माहिती आणि सखोल अभ्यासाच्या आधारे केलेल्या पत्रकारितेमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतो आणि त्यातूनच आपला टीआरपीही उंचावतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांनीही पत्रकारांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. रेणुका बुधाराम यांनी केले.

