पदवीधर-शिक्षक निवडणुकीतील पैशांच्या वाटपाची चर्चा; मतदारांपर्यंत पैसे पोहोचलेच नाहीत, मग नेमके गेले कुठे?
नेतेमंडळी या प्रकाराची दखल घेणार का? मतदारांमध्ये चर्चेला उधाण
संपादकीय
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका या सुशिक्षित, जागरूक आणि समाजाला दिशा देणाऱ्या मतदारांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. या निवडणुकांमध्ये पदवीधर आणि शिक्षक आपल्या प्रश्नांना वाचा फोडणारा, त्यांच्या समस्या समजून घेणारा आणि सभागृहात त्यांचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार निवडतात. मात्र, अलीकडील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या वाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निवडणुकीच्या काळात काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटप झाल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या चर्चेत उल्लेख होणारे पैसे अनेक मतदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याची तक्रार ऐकायला मिळत आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर मतदारांसाठी पैसे वाटप झाले असतील, तर ते पैसे नेमके कोणापर्यंत पोहोचले? मतदारांच्या नावावर फिरलेली रक्कम प्रत्यक्ष मतदारांना मिळाली का? की मध्यस्थांच्या पातळीवरच या पैशांचा प्रवास थांबला?
हा केवळ पैशांचा प्रश्न नाही, तर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आणि मतदारांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. शिक्षक आणि पदवीधर यांच्यासारख्या सुशिक्षित मतदारांच्या निवडणुकीत अशा प्रकारच्या चर्चा होणे ही चिंतेची बाब आहे.
या संपूर्ण प्रकरणाची संबंधित नेतेमंडळी, उमेदवार आणि निवडणूक यंत्रणा यांनी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. केवळ निवडणुकीच्या काळात मतदारांशी संपर्क साधणे पुरेसे नाही, तर निवडणुकीनंतर मतदारांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारीही नेतृत्वाने स्वीकारली पाहिजे.
मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. आता त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या चर्चेत तथ्य किती आणि अफवा किती, याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
यादीत टिक मार्क पण मतदारास पैसे मिळालेच नाहीत
मतदान करण्याच्या आदल्या दिवशी वरून मतदान यादी आणि त्याप्रमाणे रक्कम पाठवली होती. पण नेते मंडळींनी अगोदर ठराविक मतदारांच्या नावाने टिक मार्क करून स्वता कडेच पैसे ठेवले. त्यामुळे पदवीधर /शिक्षक मतदानासाठी गेलेच नाहीत.
शेवटी एकच प्रश्न...
पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या नावावर पैशांच्या वाटपाची चर्चा होत असेल, पण ते पैसे मतदारांपर्यंत पोहोचलेच नसतील, तर या पैशांचे नेमके झाले तरी काय? याची दखल घेऊन संबंधित नेतेमंडळी सत्य समोर आणणार का?
कारण निवडणूक संपली असली, तरी मतदारांचे प्रश्न संपलेले नाहीत!
— संपादकीय

